डॉक्टर महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: October 21, 2014 00:59 IST2014-10-21T00:39:51+5:302014-10-21T00:59:10+5:30
अहमदनगर: सारसनगर भागातील डॉ. सुजाता निलेश शेळके (वय ३८, रा. विश्वास नर्सिंग होम, मार्केटयार्डमागे, सारसनगर) यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली

डॉक्टर महिलेची आत्महत्या
अहमदनगर: सारसनगर भागातील डॉ. सुजाता निलेश शेळके (वय ३८, रा. विश्वास नर्सिंग होम, मार्केटयार्डमागे, सारसनगर) यांनी त्यांच्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.१९) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. उपचार सुरू असताना डॉ. सुजाता यांचा मृत्यू झाला.
डॉ. निलेश विश्वास शेळके यांचे मार्केटयार्ड भागात विश्वास नर्सिंग होम हे मोठे हॉस्पिटल आहे. रविवारी रात्री डॉ. सुजाता यांनी उडी घेतल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कोतवाली पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. त्यानंतर डॉ. सुजाता यांचे वडील अरुण भिला पाटील (रा. धुळे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादित म्हटले आहे की, डॉ. निलेश यांनी चारित्र्याचा संशय घेऊन, तसेच हॉस्पिटलसाठी घेतलेले कर्ज भागविण्यास माहेराहून १५ लाख रुपये आणावेत, या कारणासाठी डॉ. सुजाता यांचा मानसिक व शारीरिक छळ केला.
या छळास कंटाळून डॉ. सुजाता यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी डॉ. निलेश शेळके, त्यांचे आई-वडील, त्यांचा कोपरगावस्थित एक नातेवाईक अतुल औताडे, कार ड्रायव्हर अब्दुल अझीज अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, डॉ. शेळके दाम्पत्याचे एकमेकांशी वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तशी नोटिसही डॉ. शेळके यांनी दिली होती.
तेव्हापासून दोघे वेगवेगळे राहत होते. विश्वास नर्सिंग होमच्या इमारतीमध्ये दोन मुलींसह डॉ. सुजाता राहत होत्या. तर डॉ. निलेश शेळके हे माणिकनगर येथे राहत होते. काही महिन्यांपूर्वी छळ झाल्याने डॉ. सुजाता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, मात्र डॉ. शेळके यांच्या मित्रपरिवाराने मध्यस्थीने हे प्रकरण मिटविले. त्यानंतर शेळके दाम्पत्यानी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉ. सुजाता यांच्या आत्महत्येबाबत संशय निर्माण झाला आहे.