मद्याकडेच पाहू नका; रोजगारही महत्वाचा
By Admin | Updated: April 22, 2016 00:16 IST2016-04-22T00:03:38+5:302016-04-22T00:16:01+5:30
अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल,

मद्याकडेच पाहू नका; रोजगारही महत्वाचा
अहमदनगर : दारु निर्मितीच नव्हे तर, तेथील रोजगारदेखील महत्वाचा आहे़ केवळ एक बाजू पाहून चालणार नाही, सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याबाबत ठोस भूमिका घेण्याचे टाळले़
महसूलमंत्री खडसे गुरुवारी नगर दौऱ्यावर आले होते़ शासकीय विश्रामगृहात आयोजित टंचाई आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ मद्यासाठी पाणी देण्याबाबत पत्रकारांनी छेडले असता खडसे यांनी वरील भूमिका मांडली़ केवळ एक बाजू पाहून निर्णय घेता येणार नाही, तर त्यासाठी सर्व बाजंूनी विचार होणे गरजेचे आहे़ मद्यनिर्मितीबरोबरच तेथील रोजगारही महत्वाचा असतो. त्यामुळे सर्व बाजूनी विचार करून मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी द्यायचे किंवा नाही, याबाबत सरकार निर्णय घेईल,असे सांगून खडसे यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले़ मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे़
कुठेही पाणी कमी पडणार नाही़ वाट्टेल ते करू, प्रत्येकाला पाणी मिळेल याची सरकार व्यवस्था करेल, असे सांगायलाही ते विसरले नाहीत़ हा धागा पकडून खडसे यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वापरलेल्या पाण्याकडे अंगुली निर्देश केला़ ते म्हणाले लातूर येथील विलासराव देशमुख यांच्या कारखान्याने मांजरा धरणातील पाणी वापरले़ ते पाणी कारखान्याने वापरले नसते, तर लातूर शहरावर जलसंकटच ओढावले नसते, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
सेल्फीचे खडसे यांच्याकडून समर्थन
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वत: चा फोटो काढण्यासाठी सेल्फी काढला नाही तर काम केल्याचा आनंद त्यांना झाला़ त्यामुळे त्यांनी तो सेल्फी काढला़ त्यात काही गैर नाही, असे मला वाटते़ विरोधकांकडे मुद्दा नाही़ त्यामुळे ते कोणत्या न कोणत्या मुद्यावरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला़
आता मोटारीनेच दौरा
हेलिपॅडसाठी ५ ते १० हजार लीटर पाणी वाया जाते़ ते वाया जाणार नाही, यासाठी यापुढे मोटारीनेच नव्हे तर पायीसुध्दा दौरे करण्याची आमची तयारी असल्याचे सांगून, मीडियाच आमचे अजेंडे ठरवित असल्याची कोटी त्यांनी यावेळी केली़