जाहीरातबाजी नको, कडक कायदे करुन अंमलबजावणी करा : अण्णा हजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 19:56 IST2017-08-30T18:59:15+5:302017-08-30T19:56:41+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारने सध्या नुसता जाहीरातीवर जोर दिला आहे. प्रत्येक कामाची मोठ्या उत्साहात जाहीरात केली जात आहे. मात्र जाहिरातींमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आजिबात सुटणार नाहीत. देशात भ्रष्टाचार थांबलेला नाही.

जाहीरातबाजी नको, कडक कायदे करुन अंमलबजावणी करा : अण्णा हजारे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : केंद्र सरकारने सध्या नुसता जाहीरातीवर जोर दिला आहे. प्रत्येक कामाची मोठ्या उत्साहात जाहीरात केली जात आहे. मात्र जाहिरातींमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आजिबात सुटणार नाहीत. देशात भ्रष्टाचार थांबलेला नाही. कुठेही महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे जाहीरातबाजी न करता केंद्र सरकारने कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची भुमिका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मांडली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारे यांनी पत्र पाठविले आहे. पत्रामध्ये विविध मागण्यांसाठी दिल्लीत पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचाही इशारा हजारे यांनी या पत्रात दिला आहे.
सरकारने निवडणुकीवेळी जनतेला भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन दिले. याच मुद्द्यावर सरकार सत्तेत आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून हजारे यांनी पत्रात उल्लेख केला आहे. आपण सत्तेवर विराजमान झाल्यानंतर बदलला. भ्रष्ट्राचारासंबंधी एकही निर्णय तुम्ही घेतला नाही. माझ्या पत्रांना उत्तरेही मिळाले नाहीत. 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेला भ्रष्ट्राचार थांबविण्याच्या उपायासाठी काहीही आवाहन केलेले नाही. नागरिकांच्या हितासाठी लोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले. त्याचे कायद्यातही रुपांतर झाले मात्र सरकारकडून अंमलबजावणी होत नाही. सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या तीन वर्र्षांच्या काळात शेतक-यांसाठी काहीही केलेले नाही. मजूर, गरीब जनता यापेक्षा उद्योगपतींची जास्त काळजी आपणाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील आंदोलनाचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही हजारे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
हजारे यांनी या पत्राच्या प्रती लोकसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपतींनाही या पाठविल्या आहेत.