दादांच्या दिमातीला दिडशे पोलीस
By Admin | Updated: July 5, 2014 00:30 IST2014-07-04T23:17:32+5:302014-07-05T00:30:13+5:30
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दिमतीला दीडशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दादांच्या दिमातीला दिडशे पोलीस
अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दिमतीला दीडशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जिल्ह्यातील ठाण्यांमधूनही बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस रस्त्यावर उतरल्यामुळे पोलीस ठाणी रिकामी झाली होती.
सकाळी सातपासूनच पोलिसांनी हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, हुंडेकरी लॉन, ओम गार्डन, शासकीय विश्रामगृह आदी ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरच्या चारही पोलीस ठाण्यांसह अन्य तालुक्यातील पोलिसांची कुमकही बंदोबस्तासाठी मागविण्यात आली होती. औरंगाबाद रोड, पुणे रोड, नगर-मनमाड रोड अशा प्रमुख मार्गावर पोलिसांना फिक्स पॉइंट देण्यात आले होते. शंभर ते सव्वाशे पोलीस आणि पंधरा पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पवार यांच्या दौऱ्यामुळे पोलीस ठाणे रिकामी झाली होती. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारीही चौकाचौकात उभे होते. आजची वाहतूक सुरळीत सुरू होती. काहीकाळ शहरातून जड वाहने बंद करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी झाली नाही. आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्येचा विवाह पार पडल्यानंतर नगर-मनमाड रस्त्यावरून एकाचवेळी वाहनांची गर्दी झाली होती. या गर्दीतून वाहने पुढे सरकण्यासाठी बराच वेळ लागला. दुपारी दोनवाजेपर्यंत रस्त्यांवर सगळीकडे वाहनांची गर्दी होती. (प्रतिनिधी)
तपास थंडावला
पवार यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच कामासाठी पोलीस अधिकारी-कर्मचारी गुंतले होते. त्यामुळे गुरुवारी कापडबाजारातील आठ दुकानांमध्ये झालेल्या चोरीचा तपास थंडावला होता. गुरुवारी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.