दिवाळी की दिवाळे ?
By Admin | Updated: October 19, 2014 00:39 IST2014-10-19T00:38:37+5:302014-10-19T00:39:14+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत.

दिवाळी की दिवाळे ?
अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीच्या निकालाचे फटाके फुटणार असल्याने मातब्बर नेत्यांसह १३८ उमेदवारांच्या भवितव्याचे दिवे लागणार आहेत. विधानसभेचे निकाल कोणाची दिवाळी साजरी करतात आणि कोणाचे दिवाळे काढतात, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल. गत चार दिवसांपासून सुरू असलेली धाकधूकही काही तासांमध्येच एकदाची संपणार आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून १३८ उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. १५ आॅक्टोबरला त्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले. रविवारी (दि.१९)सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार असल्याने शिगेला पोहोचलेली उत्कंठा दुपारपर्यंत संपुष्टात येईल. आघाडी आणि युती तुटल्यामुळे कधी नव्हे एवढ्या चुरशीने लढती झाल्या. सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी धसका घेतला आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपाच्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नरम झालेली काँग्रेस, प्रथमच स्वबळावर निवडणूक लढविणारी शिवसेना यांच्यासमोर त्यांचे गड राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. युती-आघाडीच्या तुटीचा फायदा नेमका कोणाला होणार याचे राजकीय नेत्यांनी बांधलेले आराखडे सुटणार आहेत.
जिल्ह्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे किल्ले शाबित राहतात की ढासळतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपा आणि शिवसेनेत जाऊन उमेदवारी करणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. उत्तरेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा सरस ठरणार की माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची अंडरग्राऊंड यंत्रणा कोणाचा निकाल लावणार?याचेही चित्र स्पष्ट होईल. बारा आमदारांपैकी किती आमदार आपले वर्चस्व कायम ठेवतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आजी-माजी मंत्री, राज्याचे माजी मंत्री,सर्वच पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी प्रचार सभा घेवून जिल्हा ढवळून काढला.
विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली. त्याचा जिल्ह्यातील निकालावर प्रभाव राहणार की भाजपाच्या लाटेवर मतदार स्वार होणार,हे काही तासांमध्येच समोर येईल. दिवाळीआधीच निकालाचे फटाके फुटणार असल्याने कार्यकर्तेही दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान सर्व्हेचे आपटबार, सुरसुऱ्यांमुळे दोन-तीन दिवस सोशल मीडियावर चांगलेच मनोरंजन झाले. सर्व्हेचे अंदाज किती खरे होणार? याकडेही मतदारांचे लक्ष लागून आहे.
(प्रतिनिधी)