दिव्या- प्रदीपची उपकारागृहात रवानगी
By Admin | Updated: June 27, 2023 13:05 IST2014-05-13T00:47:31+5:302023-06-27T13:05:06+5:30
अहमदनगर : आरोपी दिव्या उर्फ हेमा भाटिया आणि प्रदीप कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांनी १२ दिवसांची (२३ मेपर्यंत)न्यायालयीन कोठडी दिली आहे.

दिव्या- प्रदीपची उपकारागृहात रवानगी
अहमदनगर : व्यापारी जितेंद्र भाटिया खून प्रकरणातील आरोपी दिव्या उर्फ हेमा भाटिया आणि प्रदीप कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांनी १२ दिवसांची (२३ मेपर्यंत)न्यायालयीन कोठडी दिली आहे. दोन्ही आरोपींची उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जितेंद्र भाटिया यांची हत्या जितेंद्रची पत्नी दिव्या आणि प्रदीप कोकाटे यांच्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रदीपला गावठी पिस्तूल देणारा गोट्या बेरड यालाही आरोपी करण्यात आले आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिव्या आणि प्रदीप कोकाटे यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यानंतर त्यांना दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिव्या हिने तिच्याकडील मोबाईलमधील सीमकार्ड नाल्यात फेकून दिल्याने दिव्याच्या मोबाईलवरून जितेंद्र यांच्या हत्येपूर्वी कोणाशी संपर्क झाला का? या विषयी माहिती मिळण्यास अडथळे आले आहेत. हत्येमध्ये आणखी कोणी साथीदार आहेत काय? दिव्याने दिलेले ३० हजार रुपये कुठे गेले? दिव्याच्या मोबाईलमधील संभाषण कोणाशी झाले? आदी माहिती अद्याप मिळालेली नाही. या चौकशीसाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी तपास अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांनी न्यायालयाकडे केली. मात्र तपास पूर्ण झालेला असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून आरोपींना १२ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिव्या भाटिया हिचे काही म्हणणे आहे का? याची विचारणा केली. मात्र दिव्या न्यायालयामध्ये काहीही बोलली नाही. कुणाचा दबाव आहे का, मारहाण करण्यात आली का, कोणाविरुद्ध तक्रार आहे का? असे प्रश्न न्यायालयाने दिव्याला विचारले, मात्र दिव्याने नाही असे उत्तर दिले. सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले, तर आरोपी दिव्याच्यावतीने अॅड. संजय दुशिंग आणि कोकाटे याच्यातर्फे अॅड. मनोज खेडकर, अॅड. संदीप खेडकर यांनी काम पाहिले. आरोपींचा तपास पूर्ण झाला आहे. गुन्ह्यात वापरलेला मालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याच कारणासाठी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलीस करीत आहेत. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला, तो न्यायालयाने मान्य केला. सीमकार्ड तपशील दिव्याच्या मोबाईलमधील सीमकार्ड नष्ट करण्यात आल्याने संबंधित कंपनीला सीमकार्डमधील संभाषण कोणाकोणाशी केले, याबाबतचा तपशील अद्याप मिळालेला नाही. तपशील मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तो लवकरच मिळेल. तपास पूर्ण झाला आहे. तपासामधील काही मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे. त्या बाबींची पूर्तता झाली की न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करता येईल, असे तपास अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी सांगितले.