प्रधान सचिवांकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:58 IST2016-07-11T00:41:35+5:302016-07-11T00:58:54+5:30
अहमदनगर : आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक यांनी रविवारी अचानक जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट देत झाडाझडती घेतली.

प्रधान सचिवांकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
अहमदनगर : आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सैनिक यांनी रविवारी अचानक जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट देत झाडाझडती घेतली. सचिव सैनिक यांच्या अचानक भेटीमुळे शासकीय आरोग्य सेवेत डॉक्टर कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्हा रुग्णालयात सैनिक यांनी पाच तासापेक्षा अधिक काळ वेळ दिला. यावेळी प्रत्येक विभागात फिरून रु ग्णांशी संवादही साधला. जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश त्यांनी दिले.
रविवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांनी अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपसंचालक आरोग्य डॉ. बी. आर. पवार, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. सुनील पाटील, सहायक संचालक पी. बी. बुरूटे, कुटुंबकल्याण कार्यक्रम कार्यालय, पुणे येथील सहायक संचालक डॉ. कानडे, डॉ. भारती, डॉ. देशमुख, मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रकल्प संचालक डॉ. जाधव उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांनी सचिव सैनिक यांना जिल्हा रुग्णालयाची विभागनिहाय माहिती दिली. नेत्र विभागाला जागा कमी पडत असल्याने या ठिकाणी नेत्र रुग्णांचे हाल होत असल्याचे सैनिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर जिल्हा नियोजन समितीतून यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठपुरावा करावा, असे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण नियंत्रित आहे. मात्र, आहे त्यापेक्षा हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दर महिन्याच्या शेवटी रुग्णालयाच्या अडचणी मांडा, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सैनिक यांनी यावेळी दिले.
(प्रतिनिधी)
सचिव सैनिक यांनी विविध कक्षांना भेटी दिल्या. प्रामुख्याने बालरुग्णांचा विभाग, महिलांचा प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया गृह, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा कक्ष, रक्तपेढीला भेटी दिल्या. तसेच रुग्णांशी संवाद साधला. यात त्यांच्या अडीअडचणी, त्यांना मिळणाऱ्या सुविधा योग्य आहेत का? याबाबत विचारणा केली. तसेच जिल्हा रुग्णालयाने जास्तीत जास्त रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन वाढवण्याचे आदेश दिले आहेत.