आंदोलनांनी दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय
By Admin | Updated: April 20, 2016 23:42 IST2016-04-20T23:39:17+5:302016-04-20T23:42:06+5:30
अहमदनगर : तलाठी संघाचे धरणे आणि दावणीला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले़

आंदोलनांनी दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय
अहमदनगर : महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, सातबारा संगणकीकरणातील सुधारणेसाठी तलाठी संघाचे धरणे आणि दावणीला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले़ कर्मचाऱ्यांच्या ‘काम बंद’चा अभ्यंगतांना फटका बसला़
संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच महसूलच्याच कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ नायब तहसीलदारांच्या पगारात वाढ, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठीचा त्यांचा गेल्या काही दिवसांपासून लढा सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर नगरच्या महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई वगळता इतर विभागातील सुमारे दीड हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते़ तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या बाजूला तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी ठाण मांडले होते़ तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना, सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करणे, या मागणीसाठी तलाठी संघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले़ जनावरांच्या छावण्या सुरू न करता दावणीला प्रति जनावर २०० रुपये अनुदान द्यावे, मागेल त्याला काम आणि कर्जमाफी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली़ महसूल कर्मचारी व तलाठी यांची भाषणे आणि कम्युनिस्टांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणला़
जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून दुष्काळ सुरू आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर सरकारने कमी करावा, अशी मागणी यावेळी कम्युनिस्ट व किसान सभा जिल्हा कौंन्सिलचे अॅड़ कॉ़ सुभाष लांडे, शांताराम वाळुंज, बाळासाहेब पाटील, सुधीर टोकेकर आदींनी निवेदनाद्वारे केली़
तलाठी महासंघाच्या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ यांनी केले़ आंदोलनात सुरेश जेठे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सुद्रिक, लक्ष्मीकांत रोहकले, गणेश जाधव, संतोष तनपुरे आदींचा सहभाग होता़ महसूल कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचे नेतृत्व भाऊसाहेब डमाळे यांनी केले़ उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, सरचिटणीस विजय धोत्रे, कोषाध्यक्ष कैलास साळुंके आदींचा आंदोलनात सहभाग होता़
(प्रतिनिधी)