जिल्हा बँक अधिकाऱ्यांना पिटाळले
By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:44:26+5:302014-09-02T23:58:49+5:30
राहुरी : जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले़

जिल्हा बँक अधिकाऱ्यांना पिटाळले
राहुरी : राहुरी येथील डॉ़ बा़ बा. तनपुरे साखर कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना ठिय्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले़ अधिकाऱ्यांवर वाळूफेक करीत धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत आल्या पावलांनी मागे जा, असा इशारा दिल्याने गेटमधून कारखान्याच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वसुली पथकाला कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागले़
मंगळवारी जिल्हा बँकेचे अधिकारी कारखान्याचा ताबा घेण्यासाठी येणार असल्याने कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या मुख्य कार्यालयासह गेस्ट हाऊसला कुलूप लावले होते़ जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी एस़ डी़ वाघमारे हे कारखान्याचा ताबा घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आले़ त्यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष दादासाहेब इंगळे यांचे भाषण सुरू होते़ संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना मागे फिरा, असे सांगत घोषणा देण्यास सुरूवात केली.
कारखान्याची ५०० कोटी रूपयांची मालमत्ता असताना बँकेने ३९ कोटी रूपये दाखविली़ मग बँकेने ४० कोटी रूपये कर्ज दिलेच कसे? असा सवाल माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी करून फेरमूल्यांकन करण्याचे आवाहन केले़ वाघमारे म्हणाले की, ११ महिन्यांपूर्वी कारखान्याला कर्जासंदर्भात नोटीस दिली होती़
कार्यकारी संचालकांकडून आम्ही कायदेशीर ताबा घेणार आहोत. अहवालानुसार व्हॅल्युएशन करण्यात आले असून पुन्हा व्हॅल्युएशन करण्यात येईल, असे वाघमारे यांनी स्पष्ट करीत कारखान्याच्या कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली़ त्याचवेळी संतप्त कामगारांनी त्यांना लोटीत प्रवेशव्दारापासून दूर नेले़ त्यावेळी एकाने वाळूही फेकली़ त्यामुळे विना पोलीस संरक्षण आलेल्या पथकाने पळ काढला़
आंदोलन संपल्यानंतर विरोधी संचालक शिवाजीराव गाडे यांनी कामगारांची भेट घेतली़ कर्मचाऱ्यांसमोर अप्पासाहेब गावडे, सुरेश थोरात, राणू सरोदे, भाऊसाहेब पगारे, राजेंद्र बोरूडे, राजेंद्र लोंढे, अशोक नगरे, चंद्रकांत कराळे आदींची भाषणे झाली़
पथकात बाळासाहेब भोसले, अण्णासाहेब पाटील, एम़ के.पाटील, आऱ एस़ राजहंस, ए़ आऱ पाटील, शेरकर, गोपीनाथ कोकाटे आदींचा समावेश होता.
(तालुका प्रतिनिधी)