दहिगावने : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय मुले व सर्व मुलींना शासनातर्फे प्रति विद्यार्थी दाेन गणवेश मोफत देण्यात येतात. अगोदर गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. यावर्षी मात्र ही गणवेश खरेदीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांकडे देण्यात आली आहे. यानुसार शहरटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करून बुधवारी (दि. १७) विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.
यावेळी बाजार समितीचे सभापती अनिल मडके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, सरपंच अलकाबाई शिंदे, युवा नेते संभाजी गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास दगडे, रवींद्र मडके, उपाध्यक्ष शिवाजी खराडे, मोहन खंडागळे, सदस्या शिवनंदा गिरम, केंद्रप्रमुख सुभाष शेटे आदी उपस्थित होते. शाळेमध्ये कोरोनाच्या सावटाखाली प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होत आहे. लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आनंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच गणवेश वाटप झाल्याने विद्यार्थ्यांचा हा उत्साह
आणखी वाढला असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास दगडे यांनी दिली.