निधीअभावी रखडले गणवेष वाटप
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:47+5:302020-12-09T04:16:47+5:30
अहमदनगर : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेष देण्याचे नियोजन शासनाने केले ...

निधीअभावी रखडले गणवेष वाटप
अहमदनगर : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेष देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. मात्र, यंदा दोनऐवजी एकच गणवेष दिला जाणार आहे. जिल्ह्यात गणवेषासाठी १ लाख ६३ हजार लाभार्थी असून त्यासाठी ४ कोटी ८० लाखांच्या निधीची गरज आहे. त्यातील ४ कोटी ५ लाखांची रक्कम जिल्हा परिषदेला मिळाली आहे. मात्र, उर्वरित ७५ लाखांचा निधी मिळाला नसल्याने गणवेष वाटप रखडले आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ही गणवेष योजना आहे. पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, तसेच जमाती मुले व दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना गणवेषाचा लाभ देण्यात येतो. यात प्रति गणवेष ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेषासाठी ६०० रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामागे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती या पैशातून विद्यार्थ्यांसाठी गणवेष खरेदी करत असते;
परंतु यंदा दोनऐवजी एकच गणवेष देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या एकूण १ लाख ६३ हजार २७० लाभार्थ्यांना हे वाटप होणार आहे. त्यासाठी ४ कोटी ८० लाख २४ हजार रुपयांच्या निधीची गरज असून त्यापैकी ४ कोटी ५ लाख ३७ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. अजूनही ७४ लाख ८६ हजार ९५० रुपये मिळणे बाकी असून ते मिळाल्यानंतर गणवेष वाटप होणार आहे.
-------------
जिल्ह्यात यंदा दोनऐवजी एकच गणवेष वाटप होणार आहे. त्यासाठी बराचसा निधी मिळाला असला तरी अजूनही १५ टक्के निधी अप्राप्त आहे. तो मिळाला की गणवेष वाटपाचे नियोजन करता येईल.
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी
-----------
अशी आहे लाभार्थी संख्या
मुली - ११६६८४
अनु. जाती मुले - १७६०४
अनु. जमाती मुले १९०९३
दारिद्र्यरेषेखालील मुले ९८८९
------------------------
एकूण १६३२७०
----------------