साडेचारशे किलोमीटरचे अंतर २४ तासांत केले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:29+5:302021-07-02T04:15:29+5:30
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील १५ वर्षीय सायकलपटू शिवराज धनंजय थोरात याने संगमनेर-इंदोर हे साडेचारशे किलोमीटरचे अंतर २४ ...

साडेचारशे किलोमीटरचे अंतर २४ तासांत केले पूर्ण
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील १५ वर्षीय सायकलपटू शिवराज धनंजय थोरात याने संगमनेर-इंदोर हे साडेचारशे किलोमीटरचे अंतर २४ तासांत पूर्ण केले. त्याने सायकलिंग प्रकारात एक नवा विक्रम नोंदविला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या थोरात याने केलेल्या विक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’बरोबरच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये हाेणार आहे.
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी शिवराज थोरात हा २०१५ साली स्थापन झालेल्या संगमनेर सायकलिस्ट असोसिएशनशी तीन वर्षांपूर्वी जोडला गेला. असोसिएशनच्यावतीने आयोजित नाशिक-शेगाव, संगमनेर-शिवनेरी, संगमनेर-नाशिक, संगमनेर-नारायणगाव, संगमनेर-लेण्याद्री असा अनेकदा सायकल प्रवास करत असताना त्याने विक्रमाची नोंद केली आहे. संगमनेर-इंदोर हे साडेचारशे किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी शिवराज याने सोमवारी (२८ जून) पहाटे पावणेपाचला सुरुवात केली होती. त्यासाठी रोडबाईक सायकल वापरली. तिला सेन्सर बसविले होते. ते शिवराजच्या हातातील घड्याळाशी जोडले गेले होते. त्यात प्रवासाची व इतर सर्व नोंद होत होती.
शिवराजने नाशिक, धुळे, शिरपूर येथून मध्य प्रदेशात प्रवेश केला. प्रत्येक वेळेला वातावरणात बदल होत होता. वारे उलटे वाहत असल्याने प्रवास कठीण होता. मध्य प्रदेशातील बिजासणी, माणपूर या दोन घाटांची चढाई अवघड होती. शर्थीचे प्रयत्न करत ४५० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत इंदोर गाठले.
संगमनेर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ, सदस्य श्याम कुलकर्णी, गणेश कानकाटे यांनी क्रू मेंबर म्हणून त्याच्यासोबत होते. शिवराजचे वडील धनंजय थोरात, ॲड. अनिल शिंदे, अमोल कोल्हे, गणेश शिंदे, प्रमोद लहामगे, भाऊसाहेब पानसरे यांनीही मार्गदर्शन केले.
-------------
मतदान जागृतीसाठी सायकलवारी
संगमनेर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान जागृतीसाठी मुंबई-दिल्ली हे १४०० किलोमीटरचे अंतर रिले प्रकारात ७२ तासांत पूर्ण केले होते. २०१९ मध्ये नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित पानिपत ते नाशिक हे १४०० किलोमीटरचे अंतर त्यांनी नऊ दिवसांत पूर्ण केले.
--------------------
संगमनेर-इंदोर हे अंतर सायकल चालवीत पूर्ण करत असताना अनेकदा आता थांबावे, असा विचार मनात येत होता; परंतु टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार मनाशी केला असताना माझ्या सोबत असलेल्या सर्वच क्रू मेंबर यांच्या मार्गदर्शनाने नवा विक्रम करता आला.
- शिवराज थोरात, सायकलपटू, संगमनेर.
------------------