शवविच्छेदनावरून नेवासा फाटा येथे वादंग : पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:01 IST2017-11-17T17:00:32+5:302017-11-17T17:01:57+5:30
सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शवविच्छेदनावरून नेवासा फाटा येथे वादंग : पोलिसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला
नेवासा फाटा : सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नेवासा पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळल्याने मृतदेहाचे अखेर शवविच्छेदन करण्यात आले अन् तणाव निवळला.
नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील नवनाथ मन्नू पल्हारे (वय २८) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी उसाच्या शेतात आढळून आला होता. तीन दिवसापूर्वी त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती. नेवासा पोलीस ठाण्यात हा युवक बेपत्ता असल्याची नोंदही झालेली आहे.
शवविच्छेदनासाठी युवकाचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला, अशी मृताच्या नातेवाईकांची तक्रार आहे. संतप्त मृताचे नातेवाईक व वैद्यकीय अधिका-यांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेवासा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा करुन शांत केले. त्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. शंकरराव गडाख मित्र मंडळाचे कार्यकते, भाजपाचे युवा नेते अनिल ताके, शहराध्यक्ष पोपट जिरे, गोपीचंद पल्हारे,सुनील जाधव यांनी वैद्यकीय अधिका-यांशी शवविच्छेदनासंदर्भात चर्चा केली.
आम्ही मृतदेह सकाळी ११ वाजता रुग्णालयात आणला. त्यावेळी रुग्णालयातून शवविच्छेदन करु असे सांगण्यात आले. दुपारी तीन वाजता काही औषधेही आणण्यास सांगण्यात आले. दुपारी चार वाजता येथे शवविच्छेदन करता येणार नाही, मृतदेह नगरला हलवा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
- नारायण पल्हारे, मयताचा मावस भाऊ