वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत गैरव्यवहार

By Admin | Updated: September 2, 2014 23:58 IST2014-09-02T23:38:53+5:302014-09-02T23:58:27+5:30

पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालकांनी संगनमताने सुमारे ३८ लाख, २३ हजार, ८७४ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

Dispute in Ashwamedha Trust in Vadajire | वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत गैरव्यवहार

वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत गैरव्यवहार

पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालकांनी संगनमताने सुमारे ३८ लाख, २३ हजार, ८७४ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. लेखापरीक्षक डी. एन. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारनेर पोलीस ठाण्यात संस्थेचा अध्यक्ष ठमाशेठ दिघे, व्यवस्थापक बाळासाहेब सूर्यभान दिघेसह सोळा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकळीढोकेश्वर येथील वसंतदादा पतसंस्थेत एक कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आठवड्यापूर्वीच गुन्हे दाखल केल्यानंतर हे दुसरे प्रकरण आहे. वडझिरे येथे अश्वमेध पतसंस्थेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठेवीदारांना ठेवीच मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले होते. ठेवीदारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानंतर संस्थेचा अध्यक्ष ठमाशेठ दिघेसह व्यवस्थापक, त्याचा मुलगा अमित यासह काही संचालक गावातून गायब झाले होते. सहाय्यक निबंधक खेडकर यांनी याबाबत लेखापरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ठेवीदारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. वडझिरे येथील गणेश करकंडे, नामदेव बोरकर, मंजुळाबाई दिघे, भागचंद लंके यांच्यासह अनेक ठेवीदारांनी चार सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर लेखापरीक्षक गायकवाड यांनी सोमवारी रात्री उशिरा पारनेर पोलीस ठाण्यात अश्वमेध पतसंस्थेतील गैरव्यवहाराबाबत फिर्याद दिली. अनेक ठेवी, रकमा हडप लेखापरीक्षक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०१३-१४ मधील एक वर्षांच्या लेखापरीक्षण केल्यावर अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक यांनी संगनमताने गैरव्यवहार करताना संस्थेमध्ये हातावर रकमा घेऊन वापरणे, ठेवींवरील व्याजदरात बोगस नोंदी ओढणे, शेअर्सची रक्कम, सभासदांच्या दैनंदिन, मासिक व बचत खात्याची रक्कम न देता अडतीस लाख, तेवीस हजार ८७४ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. संचालकांच्याही ठेवी अडकल्या संस्थेचा अध्यक्ष ठमाशेठ दिघे, त्याचा मुुलगा अमित, व्यवस्थापक बाळासाहेब दिघे हे गैरप्रकाराचे प्रमुख सूत्रधार होते. त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे काही संचालक अडकलेच शिवाय संचालकांच्याही ठेवीही अडकल्या आहेत. संपदा, वसंतदादा नंतर अश्वमेध पारनेर तालुक्यात ज्ञानदेव वाफारे यांची संपदा पतसंस्था, निघोजचे मच्छिंद्र्र वराळ यांची सहकारमहर्षी, टाकळीढोकेश्वर येथील राजेंद्र गागरे यांची वसंतदादा या पतसंस्थांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येऊन या संस्थांचे संचालक व व्यवस्थापकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यानंतर आता वडझिरे येथील अश्वमेध पतसंस्थेत गैरप्रकार झाल्याने ठेवीदारांची चिंता वाढली आहे. वडझिरे येथे संपदा, अश्वमेध या दोन संस्थांमधील शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत.

Web Title: Dispute in Ashwamedha Trust in Vadajire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.