आरोग्य, पाणी पुरवठा विभागात विसंवाद

By Admin | Updated: September 3, 2014 23:59 IST2014-09-03T23:56:38+5:302014-09-03T23:59:02+5:30

अहमदनगर: साथ रोगांचा फैलाव होण्यासाठी पाणी पुरवठा विभाग प्रथम कारणीभूत असून त्यानंतर आरोग्य विभागाचीही तितकीच जबाबदारी आहे.

Disinterest in health, water supply section | आरोग्य, पाणी पुरवठा विभागात विसंवाद

आरोग्य, पाणी पुरवठा विभागात विसंवाद

अहमदनगर: साथ रोगांचा फैलाव होण्यासाठी पाणी पुरवठा विभाग प्रथम कारणीभूत असून त्यानंतर आरोग्य विभागाचीही तितकीच जबाबदारी आहे. दोन्ही विभागात विसंवाद असल्याने कावीळ, मलेरिया व डेंग्यूचा विळखा शहराला बसला आहे. महासभेसमोर विषय नसतानाही साथ रोगांवरच तीन तास वादळी चर्चा झाली. आयुक्त विजय कुलकर्णी यांचा प्रशासनावर अंकुश नाही. अशा अधिकाऱ्यांवर सभागृहाने अविश्वासाचा ठराव आणावा, अशी मागणी कैलास गिरवले यांनी केली. त्यावरून आयुक्तांनीही ही एकट्या प्रशासनाची नाही तर सामुदायिक जबाबदारी आहे असे सांगत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून हतबलता व्यक्त केली.
नगर शहरात गत महिन्यापासून साथ रोगांने थैमान घातले आहे. काविळीचे जवळपास सहाशे रुग्ण आढळून आले असून आता डेंग्यूनेही शिरकाव केला आहे. महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात होताच भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अभय आगरकर यांनी साथ रोगांचा विषय उपस्थित केला. आरोग्य व पाणी पुरवठा विभागात विसंवाद असल्याने शहरात साथ रोग पसरत आहे. कोणाला दोष देण्याचा विषय नाही पण उपाययोजना काय? असा सवाल त्यांनी केला. जनसंवादही होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाणी पुरवठा विभागातील अडाणीपणा मांडत त्यांनी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज बोलवून दाखविली. सक्षम प्रशासन हवे असेल तर कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे अशी सूचना त्यांनी केली. फेज २ ची पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने खोदल्याने पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. त्यामुळे शहराला दूषित पाणी पुरवठा होतो. ठेकेदाराला शहरात यंत्राद्वारे काम न करता ते मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना बाळासाहेब बोराटे यांनी मांडली. क्लोरिनाईझेशनसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी नगरसेविका छाया तिवारी यांनी केली.
नियंत्रण नसल्याचा आरोप
कैलास गिरवले यांनी आयुक्तांच्या कारभाराचे वाभाडे काढत सभागृहाने अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली. आयुक्तांनी शहराला अथवा महापालिकेच्या मुख्य कार्यालय, प्रभाग कार्यालयांना भेटी दिल्याचे कधी दिसले नाही. साथ रोग पसरल्यानंतर एकाही भागाला भेट दिली नाही. अधिकाऱ्यांना शहर विकासाचे घेणे-देणे नाही. ज्यांची शहरात विकास करण्याची मानसिकता नाही त्यांनी बदली करून दुसरीकडे जावे. नगरसेवक सभागृहात बोलतात पण प्रशासनाकडून सुधारणा काही होत नाही. आयुक्तांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने ही अवस्था झाली आहे. कर्मचारी कार्यालयात कधी वेळेत येत नाही. नुसताच टक्केवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप करीत गिरवले यांनी आयुक्तांच्या कार्यपध्दतीचा पंचनामा केला.गिरवले यांच्या या वक्तव्यावर आयुक्त कुलकर्णीही चांगलेच संतापले. नगरोत्थान, केडगाव व फेज टू या रेंगाळलेल्या योजना मीच मार्गी लावल्या प्रामाणिकपणे काम केले. तुम्हाला दुसरा अधिकारी हवा असेल तर घेऊन या, माझी हरकत नाही. चुका होतात असे सांगून आयुक्तांनी मोठ्या मनाने सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली. मात्र एकटा आयुक्त, प्रशासन काही करू शकत नाही. आकृतीबंधला मंजुरी नसल्याने कर्मचारी कमी आहेत. तरीही सभागृहाला सक्षम नसल्याचे वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव करावा, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
डॉ. राजूरकर यांचा मोबाईल नेहमीच डायव्हर्ट असतो. कधी तो स्वीच आॅफ असतो, असा आरोप अजिंक्य बोरकर, विजय गव्हाळे यांनंी केला. यावर महापौर जगताप यांनीही नाराजी व्यक्त केली. ग्रुप मोबाईल २४ तास सुरू असला पाहिजे. मोबाईल बंद ठेवला तर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल अशी तंबी आयुक्त कुलकर्णी यांनी प्रत्येक विभागप्रमुखाला दिली.

Web Title: Disinterest in health, water supply section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.