तीन सदस्य प्रभाग पद्धतीने नगरसेवकांचा भ्रमनिरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:20+5:302021-09-23T04:24:20+5:30
अहमदनगर : महापालिका व नगरपालिकांच्या आगामी निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होतील, अशी आशा नगरसेवक बाळगून होते. तशी शक्यता ...

तीन सदस्य प्रभाग पद्धतीने नगरसेवकांचा भ्रमनिरास
अहमदनगर : महापालिका व नगरपालिकांच्या आगामी निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होतील, अशी आशा नगरसेवक बाळगून होते. तशी शक्यता गृहित धरून आजी-माजी नगरसेवक, युवा कार्यकर्त्यांनी आखली होती. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेसह नगरपालिका नगरसेवकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे. तीन सदस्यीय पद्धतीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकरिता प्रभाग पद्धती निश्चित करण्यावरून महाविकास आघाडीत खल सुरू होता. यावर गेल्या दोन महिन्यापासून निर्णय होत नव्हता. आगामी निवडणुका एक सदस्यीय पद्धतीनुसारच होतील, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती. प्रभाग लहान होणार असल्याने निवडणूक लढविणे सोपे होईल, म्हणून अनेक जण बिनधास्त होते. पूर्वीचे प्रभाग संपुष्टात येऊन नवीन प्रभाग रचना होईल. एक प्रभाग नगरसेवक, अशी पद्धत राहील. त्यामुळे अनेकांनी पुढच्या निवडणुकीतून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची तयारी चालविली होती. सध्या एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. पुढची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीनुसार होणार नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना सध्याच्या प्रभागात कामे करण्यात फारसा रस नाही. आगामी निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाल्यास आपल्याला कोणता भाग सोयीस्कर राहील. त्या भागात काय समस्या आहेत. त्या कशा सोडविता येतील, यावर विद्यमान नगरसेवक काम करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. पुढच्या निवडणुकीला एक सदस्यीय पद्धत राहील. त्यामुळे प्रभागाचे चार तुकडे करीत आपापल्या भागात कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. काहींनी पूर्वीच्या प्रभागातून आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. तर काहींनी नव्या प्रभागावर आपली पकड निर्माण केली आहे. एवढेच नाही तर काही नगरसेवक सध्याच्या प्रभागात कमी आणि पुढील निवडणुकीत येणाऱ्या भागात अधिक काळ दिसतात. त्यादृष्टीने नगरसेकांनी त्या भागात संपर्कही वाढविला होता. मात्र आता त्रिसदस्यीय पद्धतीचा निर्णय झाल्याने चौथ्याने जायचे कुठे, असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. त्यावरून राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.
................
प्रभागाचे तुकडे आले अंगलट
सध्याच्या प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यांनी एक सदस्यीय पद्धतीनुसार निवडणुकीची तयारी केली होती. आपापसात बसून प्रभागाचे चार तुकडे केले. एकमेकांच्या भागात ते फिरकतही नव्हते. इतरांच्या भागातील कार्यक्रम, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांना हजेरी लावणेही नगरसेवक टाळत होते. त्यामुळे नगरसेवक शोधूनही सापडत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. त्रिसदस्यीय पद्धतीचा निर्णय झाल्याने नगरसेवकांना सध्याच्या भागात काम करावे लागणार आहे.
----
अहमदनगर महापालिका
एकूण प्रभाग- १७
एकूण नगरसेवक-६८
संभाव्य प्रभाग-२३
संभाव्य नगरसेवक-७० ते ७२