‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:44 IST2019-06-14T17:44:39+5:302019-06-14T17:44:57+5:30
दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते.

‘सेतू’मध्ये दाखल्यांची असुविधा
उमेश कुलकर्णी
पाथर्डी : दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना जातीचे,नॉनक्रिमीलेअर, ओबीसी दाखले मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दररोज सेतू केंद्रात हेलपाटे मारून आमचा दाखला झाला का? असे प्रश्न विचारत आहेत. दाखल्यांच्या या घोळामुळे विद्यार्थी गडबडून गेले आहेत.
दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध दाखले गोळा करण्यात मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळणारे दाखले पंधरा दिवसांपासून न मिळाल्यामुळे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. एक जूनपासून सेतू केंद्राला ‘आॅन लाईन सबमिशन करा’ असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेतू केंद्राने आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु आजतागायत हे दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालक सेतू केंद्रात दररोज हेलपाटे मारताना दिसत आहेत. रहिवाशी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, शेतकरी, ३३ टक्के महिला आरक्षण असे दाखले तहसीलमधून मिळतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून तहसील कार्यालयात ‘थंब’ द्यायला अधिकारी नसल्यामुळे हे दाखले विद्यार्थ्यांना मिळाले नव्हते. परंतु बुधवारी तहसीलच्या अधिकाऱ्यांनी ‘थंब’ दिल्यानंतर गुरूवारपासून हे दाखले मिळायला सुरूवात झाली आहे. दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज असते. विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदारांनी याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने पालकांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. त्यातच दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे पालक व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.
नागरिकांना महा-ई-सेवा केंद्रातून देण्यात येणाºया दाखल्यांसाठी सरकारने दर निश्चित केले आहे. मात्र काही ई-सेवा केंद्रे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पाथर्डी-नगर रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सध्या फक्त दाखल्यांचीच चर्चा आहे.