‘महावितरण’विरुध्द असंतोष
By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-25T00:15:16+5:302014-07-25T00:26:14+5:30
शेवगाव : तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी वीज कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले.

‘महावितरण’विरुध्द असंतोष
शेवगाव : तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या येथील सहाय्यक अभियंता कार्यालयास टाळे ठोकले.
तालुक्यातील रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे काम रखडले आहे. हे काम तातडीने मार्गी लागावे, या मागणीसाठी ग्रामस्थ व भाकपच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने वीज वितरण कंपनीच्या शेवगाव येथील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता. त्या अनुषंगाने कॉ.संजय नांगरे, किसान सभेचे बापूसाहेब राशीनकर,भाकपचे भगवान गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता सतीश शिंपी यांना चांगलेच धारेवर धरले. चर्चा करूनही मार्ग निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर आणून कार्यालयास टाळे ठोकले. आंदोलनामुळे सहाय्यक अभियंता शिंपी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्नाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी वीज वितरण कंपनीच्या नगर येथील अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार रावतळे-कुरुडगाव येथील सिंगल फेज योजनेचे काम आजच युद्धपातळीवर सुरू करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन शिंपी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात संजय लहासे, बाळासाहेब तुजारे, नवनाथ खंडागळे, रवींद्र निळ, सुभाष गरुड, उमाजी जवरे, अनिल निळ आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
छावण्यांसाठी रास्ता रोको
तिसगाव : पाथर्डी तालुका दुष्काळी जाहीर करुन जनावरांच्या छावण्या सुरु कराव्या, खरीप हंगामाची नुकसान भरपाई मिळावी, या मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्यावतीने गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील त्रिभूवन फाट्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तिसगावच्या आठवडे बाजारामुळे महामार्गावर होत असलेली वाहनांची कोंडी पाहून पोलिसांनी आंदोलकांना बाजुला होण्याची जबरदस्ती केली. यावेळी आपचे ज्येष्ठ नेते सुधाकर आव्हाड,संघटक किसन आव्हाड यांनी पत्रकारांना पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी केलेल्या दमदाटीचा निषेध केला. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे सुधाकर आव्हाड यांनी सांगितले. प्रेसक्लबच्यावतीने सुभाष केकाण यांनी तहसीलदार सुभाष भाटे यांना निवेदन दिले. त्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. यावेळच्या चर्चेत किरण उपकारे,अंबादास कारखेले, मच्छिंद्र पालवे, हमीद बागवान, महेंद्र गर्जे, भाऊसाहेब पालवे यांनी सहभाग घेतला.
नाभिक समाजाचा मोर्चा, ठिय्या
पाथर्डी: पाथर्डी: नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, समाजाला सामाजिक न्याय मिळावा व इतर प्रमुख मागण्यांसाठी गुरूवारी नाभिक समाजाच्यावतीने पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यालय आवारात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व समाजाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुखदेव मर्दाणे यांनी केले. नाभिक समाज व संत सेना महाराज सलून व व्यावसायिक संस्था यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चा गेटवरच अडविण्यात आला. त्यामुळे गेटवरच ठिय्या देण्यात आला. सुखदेव मर्दाणे म्हणाले, नाभिक समाज हातावर पोट भरणारा असल्याने या समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश झालाच पाहिजे. मागणी तात्काळ मान्य न केल्यास ११ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
रस्त्यासाठी नगर-दौंड मार्गावर रास्ता रोको
श्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ रेल्वे गेट ते बेलवंडी स्टेशन रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाआघाडीच्यावतीने नगर-दौंड मार्गावरील लोणी रेल्वेगेट येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूमांनी भरुन डांबरीकरणाचे बील काढण्याचे काम सध्या चालू आहे, असा आरोप सेनेचे नंदकुमार ताडे यांनी केला. या खराब रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णा पाचपुते यांनी केला. जितेंद्र पितळे, संतोष जठार, रावसाहेब रासकर, भाऊ डांगे यांचीही भाषणे झाली. आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे नगर-दौंड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.