शिष्यांना गुरूभेटीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:31+5:302021-07-23T04:14:31+5:30
अहमदनगर : शाळा म्हणजे शिक्षक व विद्यार्थी या गुरू-शिष्याचे घट्ट नाते. शाळेत शिक्षक रोज आपल्या या शिष्यांना संस्काराचे पैलू ...

शिष्यांना गुरूभेटीची आस
अहमदनगर : शाळा म्हणजे शिक्षक व विद्यार्थी या गुरू-शिष्याचे घट्ट नाते. शाळेत शिक्षक रोज आपल्या या शिष्यांना संस्काराचे पैलू पाडतात. त्यांचे आयुष्य घडवतात. परंतु कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने गुरू-शिष्यांमधील हे अंतर दुरावले आहे. ऑनलाइन शिक्षण भलेही सुरू असेल, परंतु त्यात पूर्वीएवढा गोडवा नाही. आजही विद्यार्थीरूपी या शिष्यांना आपल्या शिक्षकरूपी गुरूंना भेटण्याची आस लागलेली आहे.
गुररपौर्णिमेच्या निमित्ताने ‘लोकमत’ने काही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांच्यातील प्रेमाची प्रचिती आली. आपल्या शिष्यात गुण रुजविण्याची जिद्द ज्याच्यात ते गु.रू.जी. गुरू-शिष्याचे हे नाते मुळात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याच भोवती जास्त फिरते. शिक्षण म्हणजे भविष्य आणि ते घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची असते. शिक्षक मुलांचे मित्र आणि मार्गदर्शक असतात. पालकांएवढीच ते मुलांची काळजी घेतात. किंबहुना शाळेतील ते मुलांचे पालकच असतात. परंतु कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने या नात्यात काहीसे अंतर आले आहे. ऑनलाइन शिक्षण भलेही सुरू असेल, परंतु त्यात गुरू-शिष्याच्या प्रेमाचा ओलावा नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षकांमधून होत आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू असताना शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष असते. तो कसा वागतो, बोलतो, त्याची शिक्षणातील प्रगती-अधोगती यावर शिक्षकाची थेट नजर असते. परंतु ऑनलाइन शिक्षणाच्या या प्रवाहात या बारीक गोष्टी दुर्लक्षित होतात. त्यामुळे विद्यार्थी जडणघडणीचा हेतू काहीसा मागे पडतो. त्यामुळे कोरोनाचे हे संकट लवकर संपून शाळा सुरू व्हावी व या गुरू-शिष्यांची भेट व्हावी, अशीच त्यांची भावना आहे.
---------------
गुरू-शिष्याच्या नात्याची परंपरा व्यापक आहे. कोरोनामुळे जरी यात काहीसा दुरावा आला असला, तरी ती कसर शाळा सुरू झाल्यानंतर भरून काढता येईल. परंतु आजही अनेक शिक्षकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून, गृहभेटीच्या निमित्ताने विद्यार्थीप्रति आपले नाते घट्ट ठेवलेले आहे.
- पोपट धामणे, मुख्याध्यापक, निंबळक, जि. प. शाळा (फोटो )
-------------------
कोरोनाच्या काळात शिक्षक ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते, अजूनही आहेत. परंतु आता प्रत्यक्ष शाळा सुरू होऊन शिक्षकांना भेटावेसे वाटते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांकडून आमच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा.
- प्रतीक्षा गाडे, विद्यार्थिनी, सहावी, जि. प. शाळा, निंबळक (फोटो)