इंदौरपर्यंत जाऊनही बीएनपी गुंतवणूकदारांची निराशा
By Admin | Updated: July 31, 2016 01:03 IST2016-07-31T00:58:20+5:302016-07-31T01:03:01+5:30
अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

इंदौरपर्यंत जाऊनही बीएनपी गुंतवणूकदारांची निराशा
अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. रक्कम मिळावी म्हणून काही एजंटांनी थेट या कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या इंदौर येथे चकरा मारल्या. मात्र, तिथे त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर या एजंटांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली परंतु पोलिसांकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, ग्राहक मंचातही एक तक्रार दाखल आहे.
बीएनपी या साखळी प्रकारातील व्यवसायात जिल्हाभरातील सुमारे २० हजार ग्राहकांची ६० कोटींच्या पुढे रक्कम अडकलेली असून, १५ दिवसांपूर्वी नगरमधील कंपनीचे कार्यालयही बंद झाल्याने गुंतवणूकदारांत खळबळ उडाली. याबाबत ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर तक्रार केलेल्या गुंतवणूकदार, एजंटांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. गुंतवणुकीचे पैसे मिळत नसल्याने धास्तावलेल्या एजंटांनी कंपनीशी संपर्क करून पैशाबाबत विचारणा केली, परंतु ठोस आश्वासन मिळाले नाही.
तीन महिन्यांपूर्वी साधारण २० एजंट इंदोर येथे कंपनीच्या मुख्य कार्यालयात जाऊन आले. तेथील अधिकाऱ्यांकडून त्यांना महिनाभरात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले, परंतु तेही हवेत विरले. त्यानंतर सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली, तरी पोलिसांकडून अद्याप तपासात काहीही प्रगती नाही.
दरम्यान, याच एजंटांनी ग्राहक मंचातही तक्रार दिलेली आहे. या प्रकरणाचा गवगवा झाल्याने आता गुंतवणूकदार पुढे येत असून पोलिसांत आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)
कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी दाद देत नाहीत. आम्ही सर्वजण इंदोर येथे जाऊन आलो, परंतु निराशा झाली. आता तर ते फोनही घेत नाहीत. गुंतवणूकदारांत प्रचंड संताप आहे. पोलिसांनी चौकशी केली तर यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत.
-दीपक कुलकर्णी, केडगाव, गुंतवणूकदार, एजंट.
बरीचशी गुंतवणूक ही नातेवाईक, मित्रांमध्येच असल्याने ते संयम ठेवून आहेत, परंतु कधी ना कधी रक्कम द्यावीच लागेल. लाखोंची रक्कम अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पोलिसांकडे तक्रार केली आहे. यातून योग्य तो मार्ग काढावा, एवढीच अपेक्षा आहे.
- सुनील राजुळे, श्रीरामपूर, गुंतवणूकदार, एजंट.