बेलापुरात सापडलेल्या गुप्तधनाला वेगळे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST2021-09-16T04:27:01+5:302021-09-16T04:27:01+5:30
सुनील यांनी खटोड यांच्या बेलापूर येथील घराजवळील जागेत खोदकाम केले होते. त्यावेळी तेथे गुप्तधन मिळून आले. मात्र या प्रकाराची ...

बेलापुरात सापडलेल्या गुप्तधनाला वेगळे वळण
सुनील यांनी खटोड यांच्या बेलापूर येथील घराजवळील जागेत खोदकाम केले होते. त्यावेळी तेथे गुप्तधन मिळून आले. मात्र या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये याकरिता ११ लाख रुपये देण्याचा शब्द खटोड यांनी दिला. त्यातील एक लाख २८ हजार रुपये त्यांनी रोख दिले होते. मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ केली. याउलट कुटुंबाला दमबाजी करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी दिली. रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणण्याची धमकी खटोड यांनी कुटुंबाला दिली, अशी फिर्याद वंदना यांनी दिली आहे.
गुप्तधन सापडल्यामुळे पैसे मिळणार असल्याची चर्चा पती सुनील यांनी कुटुंबात केली होती. या पैशांसाठी खटोड यांच्याकडे वारंवार मागणी केली. मात्र गायकवाड यांच्यामुळेच आपल्याला गुप्तधनात मिळालेली चांदी सरकार जमा करावी लागली, असे खटोड यांचे म्हणणे होते. ते सतत दमबाजी करत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
केवळ फिर्यादीवरून पुढील कारवाई केली जाणार नाही. पोलीस साक्षीदारांचे जबाब नोंदविणार आहेत. मयत सुनील याने खटोड यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल नातेवाइकांना माहिती कळविली असल्याबाबत तपास केला जाणार आहे. त्यानंतरच खटोड यांना अटक केली जाईल,अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी दिली.
---------
खटोड फरार
गुन्हा दाखल होताच राजेश खटोड व हनुमंत खटोड हे फरार झाले आहेत. तपासी अधिकारी घायवट यांनी त्यास पुष्टी दिली. बुधवारी पोलिसांनी काही साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये गुप्तधनाचे खोदकाम करणाऱ्या अन्य मजुरांचा समावेश आहे.
-------