डिझेलचे दर भडकताच शेतीची मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:09+5:302021-02-05T06:41:09+5:30
श्रीरामपूर : गेल्या वर्षभरात डिझेलमध्ये तब्बल १५ रुपयांची दरवाढ नोंदविली गेल्याने शेतीच्या मशागतीला त्याचा जबर फटका बसला आहे. डिझेल ...

डिझेलचे दर भडकताच शेतीची मशागत महागली
श्रीरामपूर : गेल्या वर्षभरात डिझेलमध्ये तब्बल १५ रुपयांची दरवाढ नोंदविली गेल्याने शेतीच्या मशागतीला त्याचा जबर फटका बसला आहे. डिझेल लिटरमागे ८३ रुपयांवर भडकल्यामुळे ट्रॅक्टरची मशागत ३० टक्क्यांनी महागली आहे. त्या तुलनेत शेतमालाच्या दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात डिझेलचे दर ८३ रुपयांवर पोहोचले आहेत. जानेवारी २०२० मध्ये हे दर ६८ रुपयांवर होते. याचाच अर्थ वर्षभराच्या कालावधीत डिझेल १५ रुपयांनी वाढले आहे. हे दर दररोज उसळी घेत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
शेतीच्या मशागतीमध्ये प्रामुख्याने नांगरणीवर खर्च होतो. त्या खालोखाल रोटाव्हेटर, पेरणी, शेतातील पालापाचोळ्याची कुट्टी ही मशागतीची कामे ट्रक्टरने केली जातात. उस तसेच कांद्याच्या लागवडीकरिता अनेकदा दोन वेळा नांगरणी करण्याची वेळ येते. अशा वेळी खर्चात वाढ होते. हल्ली कांद्याच्या लागवडीऐवजी पेरणी करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे पैशांची बचतही झाली आहे.
-----------
मशागतीत महाराष्ट्र खर्चिक
राज्यातील जमिनीच्या पोतामुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. नांगरणीनंतर शेतातील माती मोकळी होण्याऐवजी ढेकळं निघण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दोनदा नांगरणी किंवा रोटाव्हेटर फिरवावा लागतो. अंतर मशागतही करावी लागते. उत्तर भारतातील राज्यांमध्ये मात्र त्याची आवश्यकता भासत नाही. तेथील जमीन ही मोकळी आणि रेतीमिश्रित आहे. त्यामुळे तेथे नांगरणीचा खर्च होत नाही.
-----------
मशागतीचे दर (प्रती एकर) सन २०२० व २०२१
नांगरणी - १५०० : २०००
रोटा - १२०० : १६००
पेरणी - ७०० : ११००
अंतरमशागत - १००० : १३००
पालाकुट्टी - ६०० : ९०० (प्रति तास)
-----------
मशागतीचा एकरी ६ हजार खर्च
नांगरणीपासून पेरणीपर्यंतच्या ट्र’क्टरच्या मशागतीसाठी एकरी सहा हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. उसासारख्या पिकाला तीन-चार वेळा अंतर मशागत करावी लागते. त्यासाठी स्वतंत्र चार ते पाच हजार रुपये खर्ची पडतात, अशी माहिती शेतकर्यांनी दिली.
--------------
महाराष्ट्रात ट्रक्टरच्या मशागतीचा तसेच मजुरीचा खर्च इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत. शेत मालाचा उत्पादन खर्च काढताना इतर राज्यांतील किमान खर्च गृहित धरला जातो. त्याचा राज्यातील शेतकर्यांना फटका बसतो. त्यामुळे देशातील एकूण शेतमालाच्या उत्पादनाचा सरासरी खर्च काढून कृषी मूल्य आयोगाने मालाचे भाव निश्चित करावेत.
सुरेश ताके, नेते, स्वाभीमानी शेतकरी संघटना, श्रीरामपूर.
------------