परीक्षा दिली पण़़़?
By Admin | Updated: January 16, 2016 23:10 IST2016-01-16T23:07:21+5:302016-01-16T23:10:14+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़

परीक्षा दिली पण़़़?
अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़ बीडला पेपट फुटला मग आपले काय, असा प्रश्न हे परीक्षार्थी एकमेकांना करीत होते़ सायंकाळी उशीरा टीईटी परीक्षाच रद्द झाल्याची बातमी धडक्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली़ रात्री उशीरापर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात परीक्षेबाबत दूरध्वनीवरुन विचारणा होत होती़
नगर शहरात ६२ केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाली. यात दोन्ही पेपरला मिळून २० हजार ३६६ पैकी १ हजार ७४८ परीक्षार्थींनी दांडी मारली. परीक्षा संपल्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत पेपर सील करून ठेवण्यात आले असून रात्री पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.
शनिवारी शहरातील ६२ शाळा, हायस्कूल येथे टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पहिला पेपर झाला. या परीक्षेसाठी २९ केंद्र होते. या पेपरसाठी १० हजार ८६८ परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातून परीक्षेसाठी ९ हजार ९१८ उमेदवार हजर होते. ९५० परीक्षार्थींनी पहिल्या पेपरला दांडी मारली. दुपारच्या टप्प्यात दुसरा पेपर झाला. या पेपरसाठी ९ हजार ४९८ परीक्षार्थी यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ८ हजार ७०० जणांनी पेपर दिला. या पेपरला ७९८ जणांनी दांडी मारली.
परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या पथकाने विविध केंद्रांना भेटी देत पाहणी केली. परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात टीईटीचा पेपर फुटला असल्याची चर्चा नगरमध्ये धडकली. यामुळे शिक्षण विभाग काळजी घेताना दिसत होते. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी रमजान पठाण, शिवाजी कराड, एस. एम. वाव्हळ, अभयकुमार वाव्हळ यांनी परिश्रम घेतले.
शनिवारी सायंकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षा रद्द करण्याची घोषणा करीत दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली़ यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले़
(प्रतिनिधी)