वीरगाव येथे कालवा फोडून धुळवड साजरी; लाखो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:11 IST2018-03-03T19:11:45+5:302018-03-03T19:11:58+5:30
वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

वीरगाव येथे कालवा फोडून धुळवड साजरी; लाखो लिटर पाण्याची नासाडी
गणोरे : वीरगाव (ता. अकोले) येथे शुक्रवारी अज्ञात लोकांनी आढळा धरणाचा उजवा कालवा फोडून ‘धुळवड’ साजरी केली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. हा संतापजनक प्रकार उशिराने शनिवारी सकाळी जलसंपदा विभागाच्या सिंचन यंत्रणेला समजला.
कालव्याला मोठ्या प्रमाणात पडलेले भगदाड बुजविण्यासाठी जेसीबी यंत्राचा शोध व पाण्याच्या नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अखेर विस्कळीत झालेले पाण्याचे आवर्तन दुपारी पूर्ववत सुरू करण्यात आले. यावेळी गावक-यांनी बघ्यांची भूमिका पार पाडली. कालव्याच्या पाण्याने गावतळे व बंधारे तुडुंब भरले आहेत. गावक-यांच्या एका दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचे दिसून येत असले, तरी पाण्याचे मोठे नुकसान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक आहे. वीरगाव या एकाच ठिकाणी सातत्याने प्रत्येक आवर्तनात कालवा फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनीही अनेकदा गंभीर घटनांबद्दल डोळेझाक करण्याची भूमिका घेतल्याने कारवाईचा धाक उरला नसल्याचे दिसते आहे.
अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या पाण्याचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले आहे. उजव्या कालव्याची पाणी वहन क्षमता ६८ क्यूसेकची असून, पूर्ण क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, येत्या २८ फेब्रुवारी रोजी रब्बी हंगामातील नियमानुसार आवर्तन चालू ठेवण्याचाच कालावधी संपला आहे. त्यानंतर १ मार्चपासून सुरू होणा-या उन्हाळी हंगामातही आवर्तन रब्बीच्या नावाने सलग सुरू राहणार असल्याची चिन्हे आहेत. धरणात सध्या सुमारे ५५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. लाभक्षेत्रात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.