गणेशोत्सवात घुमणार ढोल ताशा

By Admin | Updated: August 24, 2014 23:08 IST2014-08-24T23:06:04+5:302014-08-24T23:08:57+5:30

शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़

Dhol Tasha walks around Ganesh Festival | गणेशोत्सवात घुमणार ढोल ताशा

गणेशोत्सवात घुमणार ढोल ताशा

अहमदनगर : मागील चार ते पाच वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे हा चांगलाच आकर्षणाचा विषय ठरत होता़ मात्र, ध्वनीप्रदूषण, प्रशासनाचा धाक आणि दरवाढ याला कंटाळून शहरासह जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा पारंपरिक वाद्याला पसंती दिली आहे़ त्यामुळे यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सवात बहुतांश ठिकाणी डीजे ऐवजी ढोल-ताशा, डोलीबाजा, झांजपथक आणि सनई चौघड्यांचा आवाज घुमणार आहे़ शहरासह उपनगरातील वीस मंडळांच्यावतीने गणेश चतुर्थी, आरास उद्घाटन आणि अनंत चतुदर्शीला पारंपरिक वाद्य वाजविण्यात येणार आहेत़ शहरातील मानाच्या बारा गणेश मंडळांनी डीजे न वाजविण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत झाले़ डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठे ध्वनीप्रदूषण होते़ त्यातच डीजेसाठी वाहन, लाईट व जनरेटरची व्यवस्था मंडळालाच करावी लागत असल्याने मोठा खर्च होतो तर ६५ डेसिबलपेक्षा पुढे डीजेचा आवाज गेला की, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई होते़ यापेक्षा अगदी कमी दरात पारंपरिक वाद्यपथक उपलब्ध होत आहे़ महाराष्ट्राची परंपरा वृध्दिंगत करणारे ढोल-ताशा, डोलीबाजा आणि झांजपथक भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत़ शहरातील पारंपरिक वाद्यपथकांना जिल्ह्यासह बाहेरूनही मागणी वाढली आहे़ (प्रतिनिधी)
डोली बाजाला मागणी
इतर इलेक्ट्रॉनिक वाद्याच्या तुलनेत डोली बाजाची अगदी कमी दरात सेवा पुरविण्यात येते़ कमी आवाज आणि कलात्मक पद्धतीने सादरीकरण करण्यात येते़ त्यामुळे मिरवणूक पाहाणाऱ्यांचे मनोरंजन होते़ यावर्षी बहुतांश गणेश मंडळांकडून डोली बाजाला मागणी वाढली आहे़
- अमोल कणगरे, डोलीबाजा पथक संचालक
भाविकांसाठी आकर्षण
कोणत्याही मंगलमय उत्सवात ढोल-ताशा पथकाला सर्वांचीच पसंती असते़ यावर्षी खास नगरच्या गणेश मंडळांना सेवा पुरविण्यासाठी ढोल-पथकाची स्थापना करण्यात आली असून, ७० जणांचे ढोल-ताशा पथक भाविकांचे मनोरंजन करणारे ठरत आहे़ शहरातील अनेक गणेश मंडळांनी सादरीकरणासाठी आमंत्रित केले आहे़
- तन्मय घोडके, तालयोगी ढोलपथक, संचालक.

Web Title: Dhol Tasha walks around Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.