अकोलेत संगमनेरी दारूचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:34+5:302021-09-03T04:21:34+5:30
कोतूळ : परिसरातील अंभोळ गावात आठ दिवसांपूर्वी मद्यपींनी एका वृद्ध महिलेचा खून केला. बुधवारी गावातील तरुणांनी दारूअड्डा उद्ध्वस्त केला. ...

अकोलेत संगमनेरी दारूचा धिंगाणा
कोतूळ : परिसरातील अंभोळ गावात आठ दिवसांपूर्वी मद्यपींनी एका वृद्ध महिलेचा खून केला. बुधवारी गावातील तरुणांनी दारूअड्डा उद्ध्वस्त केला. या प्रकरणाने संपूर्ण अकोले तालुक्यात अवैध दारू पुरवणारे संगमनेरातील अवैध दारू रँकेट चर्चेत आले आहे.
आठ दिवसांपूर्वी अंभोळ गावात दोन मद्यपींनी सत्तर वर्षे वयाच्या वृद्ध महिलेच्या घरात दारू पिऊन तिचा खून करून दागिने लंपास केले. काल याच गावातील एका वस्तीत तरुणांनी अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त करून मोठ्या संख्येने दारू बाटल्या फोडल्या. कोतूळ परिसरातील अंभोळ, कोहणे, विहीर, खडकी, कोतूळ, ब्राह्मणवाडा, वाघापूर, लिंगदेव या ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी थेट कारवाई करून हे धंदे बंद केले. मात्र गेल्या आठवड्यापासून कोतूळ, राजूर, देवठाण, समशेरपूर परिसरात अवैध दारू विक्रीने धिंगाणा घातला आहे. अकोले तालुक्यातील अकोले - राजूर रस्त्यावर एका हॉटेलात संगमनेर (घुलेवाडी) येथील परवानाधारक दुकानातून ही दारू अकोलेत सर्वदूर पोहोच केली जाते. विशेष म्हणजे हे दुकान उत्पादन शुल्कच्या कार्यालयाजवळ आहे तर दररोज दुकानाची विक्री जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
....
अवैध दारू विक्री का वाढली
०० अकोले तालुक्यातील परवानाधारक दुकानातील विक्रीवर उत्पादन शुल्कने कडक नजर ठेवल्याने इथे एका व्यक्तीला मोठ्या संख्येने दारू बाटल्या मिळत नाहीत, तर ग्रामीण भागात संगमनेरी दारू बाटली ठोक भावात पन्नास रुपयांना अवैध विक्रेत्यांना घरपोच मिळते. विक्री शंभर रुपयांना होत असल्याने अनेक सुशिक्षित तरुणांचा ओढा इकडे वाढला आहे. अकोले तालुक्यात अवैध दारू खडकी, अंभोळात विक्रीने खुनांचे सत्र सुरू झाले आहे. शेवगावातही तोच प्रकार आहे. संगमनेरी दारूबाबत संगमनेरचे उपअधीक्षक व नगरचे जिल्हा अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास १ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्र्यांचे दालनात बैठा सत्याग्रह करू.
- हेरंब कुलकर्णी, राज्य दारूबंदीचे कार्यकर्ते