धनगर, लिंगायत समाजाला डावलले
By Admin | Updated: June 29, 2014 00:29 IST2014-06-28T23:48:48+5:302014-06-29T00:29:14+5:30
अहमदनगर : धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समावेश असूनही आघाडी सरकारकडून अनुसूचीत जमाती आरक्षणाचा लाभ धनगर समाजाला देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे़

धनगर, लिंगायत समाजाला डावलले
अहमदनगर : धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समावेश असूनही आघाडी सरकारकडून अनुसूचीत जमाती आरक्षणाचा लाभ धनगर समाजाला देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे़ सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे धनगर व लिंगायत समाज गेल्या ५५ वर्षांपासून उपेक्षितच राहिला असल्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगितले़
नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत डांगे बोलत होते़ ते म्हणाले, सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले आहे़ मात्र, धनगर व लिंगायत समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवले आहे़ मराठा, मुस्लीम, धनगर व लिंगायत समाजाच्या आरक्षणाची घोषणा एकाचवेळी व्हायला पाहिजे होती़ मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्येकवेळी आश्वासने देऊन समाजावर अन्याय केला आहे़ मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आश्वासने देऊन फसविल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे़ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांनी १६ व १७ जून रोजी चार-चार तास धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या़ आरक्षणासंदर्भाच्या बाबी पडताळून पाहून १० ते १२ दिवसात धनगर समाजाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे़ त्यामुळे जुलै अखेर धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास धनगर समाज आघाडी सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डांगे यांनी दिला़
यावेळी मल्हार सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब तागड, जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, शहराध्यक्ष गणेश तागड आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)