अमरनाथ यात्रेत अडकले बेलापूरचे भक्त; रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटला
By शिवाजी पवार | Updated: July 11, 2023 15:10 IST2023-07-11T15:10:10+5:302023-07-11T15:10:25+5:30
बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह ५५ जण अमरनाथ यात्रेला नुकतेच गेले होते.

अमरनाथ यात्रेत अडकले बेलापूरचे भक्त; रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटला
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अमरनाथ यात्रेला गेलेले तालुक्यातील बेलापूर येथील ५५ जण रस्ता खचल्यामुळे अनंतनाग जिल्ह्यामध्ये अडकले आहेत. प्रशासनाने त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. मात्र हजारो लोक तिथे अडकल्यामुळे जम्मूपर्यंतचा आपला प्रवासह₹ कठीण असल्याची माहिती या लोकांनी लोकमतला दिली.
बेलापूर येथील विजय भगत यांच्यासह ५५ जण अमरनाथ यात्रेला नुकतेच गेले होते. मात्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे त्यांची यात्रा पूर्ण होऊ शकली नाही. अनंत नाग जिल्ह्यातील एका भागामध्ये रस्ता खचला आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला आहे. तेथील प्रशासनाच्या एका छावणीमध्ये हे सर्व जण थांबलेले आहेत. त्यांची तेथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, हजारो लोक यात्रेत अडकल्यामुळे अनंतनाग येथून जम्मूपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे. एकाच वेळेस सर्व यात्रेकरूंना बाहेर काढण्याचे काम सोपे नाही, अशी माहिती विजय भगत यांनी लोकमतला दिली. दिल्ली येथून सर्व यात्रेकरूंचे रेल्वे आरक्षण केले होते. मात्र आपण अजूनही अडकलेलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने दिल्ली येथून नव्याने रेल्वेची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.