मढी यात्रेच्या मुख्य पाचही दिवशी भाविकांना प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:24+5:302021-03-13T04:37:24+5:30
तिसगाव : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेच्या मुख्य पाचही दिवशी कानिफनाथ समाधीमंदिरासह गावामध्ये भाविकांना प्रवेशबंदी राहणार ...

मढी यात्रेच्या मुख्य पाचही दिवशी भाविकांना प्रवेशबंदी
तिसगाव : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेच्या मुख्य पाचही दिवशी कानिफनाथ समाधीमंदिरासह गावामध्ये भाविकांना प्रवेशबंदी राहणार आहे. कावडी, काठ्यांची मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी गुरुवारी दिली.
महसूल, पोलीस व देवस्थान समितीच्या विश्वस्तांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात बुधवारी सायंकाळी घेण्यात आली. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव असतो. येथील यात्रा उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. हजारो भाविक यात्रेसाठी देवाच्या काठ्या श्रद्धापूर्वक आणून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात. जात पंचायती, गाढवांच्या बाजारासह संपूर्ण यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे.
होळीपासून परिसरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. फेसबुकसह विविध समाजमाध्यमांच्या माध्यमातून यात्राकाळातील विशेष पूजा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करावे, असे आदेश प्रशासनाने देवस्थान समितीला दिले आहेत.
वाडकर म्हणाले, मढी यात्रेसाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच उत्सव व सोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. मढी येथे होळीदिवशी कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटल्यानंतर यात्रेचा प्रारंभ होतो. यावर्षी यासाठी कुठलीही मिरवणूक न होता फक्त पाच समाजबांधवांना सकाळी मंदिरात प्रवेश दिला जाईल. सायंकाळी गोपाळ समाजातील पाच मानकऱ्यांना देवस्थान समितीतर्फे मानाच्या गोवऱ्या देऊन मानाची होळी पेटविली जाईल. अन्य भाविकांसह ग्रामस्थांना या ठिकाणी प्रवेशबंदी असेल. चतुर्थी व रंगपंचमी (१ व २ एप्रिल) यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी संपूर्ण गावात जमावबंदी आदेश लागू राहणार आहे. यावेळी कोणालाही गावात प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर यात्रेचा तिसरा टप्पा असून १२ व १३ एप्रिलला अशा प्रकारची बंदी असून, मानाच्या पाच कावडींशिवाय अन्य कोणाला प्रवेश मिळणार नाही. फुलोरबाग यात्रा व गुढीपाडव्याला कोणालाही दर्शन मिळणार नाही. यात्रा कालावधीतील प्रमुख पाच दिवस पूर्णपणे बंदी आदेशाचे काटेकोर पालन होऊन कुचराई करणारे कर्मचारी, भाविक, आदींविरुद्ध नियमानुसार कारवाई होईल, असे वाडकर यांनी सांगितले.
---
इतर दिवशी नियम पाळून दर्शन सुरू
यात्राकाळ वगळता अन्य दिवशी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करीत समाधीमंदिरात भाविकांना फक्त दर्शनासाठी प्रवेश मिळेल. कोणतेही विधी, महाप्रसाद, सामूहिक पूजा, पाठ, सप्ताह असे कार्यक्रम घेता येणार नाहीत, असे वाडकर यांनी सांगितले.