विविध रोगांपासून जगाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:00+5:302021-08-21T04:25:00+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनपासून जागतिक ...

विविध रोगांपासून जगाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनपासून जागतिक योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन प्रणालीद्वारे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी योगमहर्षी स्वामी रामदेव बाबा होते. स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी भूमिका पार पाडली. जनरल सेक्रेटरी डॉ. एच. आर. नागेंद्र गुरुजी, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, सेक्रेटरी जनरल डॉ. जयदीप आर्य यांच्यासह विशेष अतिथी म्हणून हार्ट फुलनेस संस्थेचे अध्यक्ष दाजी कमलेश पटेल व साध्वी भगवती सरस्वती आदी उपस्थित होते.
रामदेव बाबा म्हणाले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील तरुणांमध्ये योग विषयक आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न इंटरनॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशनकडून सुरू आहे. त्यातूनच ग्लोबल योगास्टार स्पर्धेचे आयोजन केले गेले. या पहिल्याच स्पर्धेला जागतिक पातळीवर मिळालेला मोठा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी ६५० डॉलरचे प्रथम, ३२५ डॉलरचे दुसरे, १२५ डॉलरचे तिसरे, १०० डॉलरचे चौथे, तर ५० डॉलरचे उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतासह जवळपास २३ देशांतील सुमारे चार हजार योगासन खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी ५२ परीक्षकांनी काम केले. त्यांचा परिचय टेक्निकल डायरेक्टर उमंग द्वान यांनी करून दिला. एकता बुडैरलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.