दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार, कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:38 IST2017-09-18T05:38:32+5:302017-09-18T05:38:33+5:30
दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार रविवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भक्तांची श्रद्धा जपण्यासाठी दसरा कालावधीत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार, कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
पाथर्डी (जि. अहमदनगर) : दसरा मेळावा भगवान गडावरच घेण्याचा निर्धार रविवारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. भक्तांची श्रद्धा जपण्यासाठी दसरा कालावधीत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांना स्थानबद्ध करावे आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
परंपरेप्रमाणे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी पाथर्डीत बैठक झाली.
अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर होते. माजी आमदार दगडू पाटील बडे, डॉ़ मधुसूदन खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अॅड. सतीश पालवे आदी उपस्थित होते़
गडावरच मेळावा घेण्यासाठी २० ग्रामपंचायती तसेच रासप, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, इतर समाजांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. बीड, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थिती लावत पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके म्हणाले, नामदेव शास्त्री यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदारकीचे तिकीट मागितले होते़ ते न मिळाल्याने त्यांनी आकसाने विरोधी गटाशी हातमिळवणी करून गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली़
पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे म्हणाले, नामदेव शास्त्री यांनी अहिंसावादी भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर हिंसेचा मार्ग पत्करून गुंडांना आश्रय दिला़
>गडाच्या गादीपेक्षा कोणतेही पद श्रेष्ठ नाही. त्यामुळे तिकीट मागण्याचा प्रश्नच नाही. माझ्याच सांगण्यावरून काही तिकिटे दिली गेली, हे अनेकांना माहिती आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी जागा विकत घेतली असेल तर पुन्हा वाद का निर्माण केला जात आहे?
- महंत नामदेवशास्त्री सानप, भगवानगड