राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक
By सुदाम देशमुख | Updated: March 26, 2025 22:08 IST2025-03-26T22:07:59+5:302025-03-26T22:08:39+5:30
माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात

राहुरीत पुतळ्याची विटंबना, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको; तालुका बंदची हाक
राहुरी (जि. अहिल्यानगर) : शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समाेर आले. या घटनेमुळे शहरातील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात तणावाचे वातावरण असून माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालमीत बजरंग बली यांची मूर्ती आहे. शेजारीच महापुरुषांचा पुतळा होता. बुधवारी दुपारी दोन वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने तालमीत जाऊन पुतळ्याची विटंबना केली. काही वेळाने तरुणांच्या हा प्रकार निदर्शनास आला. काही वेळातच शेकडो युवकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा निषेध केला. जमाव आक्रमक झाला.
घटनेची माहिती मिळताच, प्रातांधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील, यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार अशोक शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, सतीश कुऱ्हाडे, राहुल यादव, नदीम शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
संतप्त शेकडो युवकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपींचा शोध घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर युवक नगर-मनमाड महामार्गावर मल्हारवाडी चाैकात आले. तिथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे यांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जवळपास तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शहरातील दुकाने पटपट बंद करण्यात आली. या घटनेबाबत राहुरी नगरपालिकेचे लिपिक हरिश्चंद्र बिवल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माेठा बंदाेबस्त तैनात
शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तसेच दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
आधी तालुका नंतर जिल्हा बंदची हाक
या घटनेमुळे गुरुवारी (दि. २७) राहुरी शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आठवडे बाजारही भरणार नाही. दाेन दिवसांत आराेपी न सापडल्यास जिल्हा बंदचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल
घटनेनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.