उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
By Admin | Updated: May 20, 2016 00:29 IST2016-05-20T00:23:27+5:302016-05-20T00:29:52+5:30
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळण्यात येईल, मात्र सेनेचे २० नगरसेवक दाखवा अन् आमचे ९ नगरसेवक घेऊन जा असे मत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडले.

उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळण्यात येईल, मात्र सेनेचे २० नगरसेवक दाखवा अन् आमचे ९ नगरसेवक घेऊन जा असे मत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडले. महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भातील वाटाघाटीची चर्चा नगरच्या स्थानिक नेत्यांशी करणार नाही. मुंबईतील राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली.
जूनमध्ये महापौर पदाची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पक्ष कार्यालयात घेतली. भाजपचे महापालिकेत ९ नगरसेवक आहेत. त्यांची मते गांधी यांनी अजमावून घेतली.
सेनेकडून सत्तेची गणिते जुळविण्याचे काम सुरू आहे. सेनेने सत्तेचे गणित जुळविले तर भाजपला उपमहापौरपद हवे आहे. हे पद मिळण्यासाठी सावेडीतील नगरसेवक एकसंघ झाले आहेत. बाबासाहेब वाकळे, महेश तवले, राजेंद्र काळे, संपत नलावडे, मनेष साठे, सुवेंद्र गांधी यांनी उपमहापौर पदावर दावा केला आहे. सावेडीत विकासाचा मोठा अनुशेष आहे. भाजपची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता आल्यास सावेडी उपनगराला उपमहापौर पद मिळावे असे मत काळे, तवले, नलावडे यांनी मांडले. मनेष साठे, सुवेंद्र गांधी यांनीही या पदावर दावा केला आहे.
अगोदर सत्तेचे गणित जुळू द्या, मग भाजपच्या श्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ. निर्णय घेताना सेनेच्या स्थानिक नेत्यांशी बोलणार नाही. मुंबईतील नेत्यांशी चर्चा करून महापौर पद व इतर पदांच्या वाटाघाटी केल्या जातील. महापौर पदाच्या निवडणुकीत सेनेची सत्तेची गणिते दोनदा चुकली आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर भाजपचा विश्वास नाही.
सेनेचे २० आणि अन्य असे मिळून सत्तेसाठी आवश्यक नगरसेवक दाखवा अन् भाजपचे ९ नगरसेवक घेऊन जा अशी भूमिका नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मात्र अजून ती वेळ दूरवर आहे. त्यामुळे आताच त्यावर चर्चा करणे योग्य नाही. सेनेच्या राज्य पातळीवर नेत्यांशी बोलून सत्तेच्या वाटाघाटी केल्या जातील असे मत गांधी यांनी मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)
महापौर पदाच्या निवडणुकीत सेनेची व्यूहरचना सुरू असली तरी विरोधकांना काही कळू न देण्यासाठी कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. गनिमी काव्याने सत्ता मिळवायची या हेतूने सेनेकडून चाल खेळली जात असल्याचे सांगण्यात येते.