ठेवीदारांचा आमरण उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:32+5:302021-06-29T04:15:32+5:30
कोतुळ, बोरी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. सुमारे ३६० पेक्षा अधिक ठेवीदार आहेत. मुदत संपलेल्या ठेवींच्या ...

ठेवीदारांचा आमरण उपोषणाचा इशारा
कोतुळ, बोरी परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. सुमारे ३६० पेक्षा अधिक ठेवीदार आहेत. मुदत संपलेल्या ठेवींच्या रकमा परत मिळाव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी केली. मात्र, त्यांना त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ठेवीदार सुनील विश्वनाथ देशमुख, अरुण नागनाथ साबळे, सखाहरी पोपट देशमुख, सुनंदा सखाहरी देशमुख, रमेश सखाहरी देशमुख, मंगल तुकाराम देशमुख या ठेवीदारांनी सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. ठेवीदारांच्या तीनपासून सहा ते सात लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पतसंस्थेत अडकून पडल्या असून पतसंस्था कार्यालयाला सध्या कुलूप आहे.
पतसंस्थेचे व्यवस्थापक, अध्यक्ष उडवाउडवीची उत्तरे देत दमबाजी करतात. मुलांच्या शिक्षणासाठी जवळपास तीन लाखांची गुंतवणूक केली, पण अद्याप एक रुपया परत मिळाला नाही, असे सुनील विश्वनाथ देशमुख यांनी सांगितले. मुलीच्या लग्नासाठी तीन लाख रुपये ठेवपावतीने गुंतवले होते. काही रक्कम मिळाली. पैसे वेळेत न मिळाल्याने शेतजमिनी विकून मुलीचे लग्न केले, असे अरुण नागनाथ साबळे सांगतात.
.............
कोतुळेश्वर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी ठेवीच्या रकमा मुदत संपून चार ते पाच वर्षे झाली तरी मिळाल्या नाहीत, असा अर्ज केला आहे. पतसंस्थेला पत्र पाठवून माहिती घेऊन कारवाई करू.
- सर्जेराव कांदळकर, सहायक निबंधक, अकोले.
...........
सध्या पतसंस्था कार्यालय बंद आहे. ठेवीदारांचे पैसे परत द्यायचे आहेत. गुरुवारी सहायक निबंधक कार्यालयात जाऊन म्हणणे मांडणार आहे.
- भास्कर विश्वनाथ देशमुख,
चेअरमन, कोतुळेश्वर पतसंस्था.