नियोजनपूर्वक प्रशासनाची कोंडी
By Admin | Updated: June 2, 2016 23:09 IST2016-06-02T23:02:06+5:302016-06-02T23:09:42+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आणि सदस्यांनी नियोजन पूर्वक शिक्षकांच्या बदल्या आणि आंतरजिल्हा बदली प्रकरणावरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नियोजनपूर्वक प्रशासनाची कोंडी
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आणि सदस्यांनी नियोजन पूर्वक शिक्षकांच्या बदल्या आणि आंतरजिल्हा बदली प्रकरणावरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या ४ ते ५ वर्षात पहिल्यांदा शिक्षकांच्या प्रश्नावर पदाधिकारी आणि सदस्य एकत्र दिसले. सभेपूर्वी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या शासकीय बंगल्यावर सभेतील कामकाजाची रणनिती ठरली होती.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांच्या समानीकरणाच्या बदल्या रद्द करण्यासोबत आंतर जिल्हा बदली पात्र शिक्षकांना पद स्थापना मिळवण्याचा सदस्यांचा डाव होता. सभेच्या आदल्या दिवशी आंतरजिल्हा बदलीसंदर्भात ना हकरत प्रमाणपत्र दिलेल्या २०७ शिक्षकांचे उपोषण सोडण्यात प्रशासनाला यश आले होते. वास्तवात हे उपोषण सभेच्या दिवसापर्यंत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यात काहींना यश आले नाही. सभेच्या दिवशी अध्यक्षा गुंड यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या निवडक सदस्यांची बैठक झाली होती. यात शिक्षकांचा प्रश्न दबाव तंत्राच्या आधारे सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे सदस्य आणि सभागृहाच्या दबावाला बळी पडले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी थेट सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सभा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहा बाहेर आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांचे शिष्टमंडळ सभेत काय निर्णय होतो, ऐकण्यासाठी सज्ज होते.
(प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समानीकरणाच्या विषयाला यापूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध केला होता. राहाता तालुक्यात चांगले काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या ७ मुख्याध्यापकांची समानीकरणात राहाता तालुक्यातून थेट शेवगाव तालुक्यात बदली झालेली आहे. या बदल्या संदर्भात विखे यांनी माहिती घेऊन या बदल्यांना स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.