संत निळोबाराय महाराज दिंडीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:45+5:302021-07-05T04:14:45+5:30
जवळे (जि. अहमदनगर) : पिंपळनेर (ता.पारनेर) येथे रविवारी (दि.४) वारकारी संप्रदायातील पाचवे संत अशी ओळख असलेेले संत निळोबाराय महाराज ...

संत निळोबाराय महाराज दिंडीचे प्रस्थान
जवळे (जि. अहमदनगर) : पिंपळनेर (ता.पारनेर) येथे रविवारी (दि.४) वारकारी संप्रदायातील पाचवे संत अशी ओळख असलेेले संत निळोबाराय महाराज यांच्या दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी एकोबा, तुकोबा, निळोबाच्या नामघोषाने परिसर दुमदुमला. एरवी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
सकाळी नऊच्या सुमारास संत निळोबाराय महाराज यांच्या वाड्यात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, पालखी पूजन आमदार नीलेश लंके, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तुकाराम महाराजांचे वंशज व तुकाराम महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख माणिक मोरे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख बाळासाहेब अरपळकर, निळोबाराय वंशज गोपाळ मकाशीर आदींच्या हस्ते पार पडली.
निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, दरवर्षीप्रमाणे दिंडीचे आज प्रस्थान झाले. १९ जुलैला सकाळी दहा वाजता निळोबारायांच्या पादुका शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून मोजक्याच भाविकांसह एसटीने पंढरपूरकडे घेऊन जाणार आहोत. तोपर्यंत पालखी निळोबाराय मंदिरामध्येच ठेवण्यात येणार आहे.
यावेळी निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, सुरेश पठारे, सेवा मंडळाचे सचिव चांगदेव शिर्के, संस्थानाचे सचिव लक्ष्मण खामकर, सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे, भाऊसाहेब लतांबळे, विकासानंद मिसाळ महाराज, दिनकर महाराज पिंगळे, एकनाथ महाराज चत्तर, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, संपत सावंत, अनिल पोटे, विजय गुगळे, बबन लतांबळे, मारुती रासकर आदी उपस्थित होते.
नीलेश लंके म्हणाले, हे निळोबाराया माझ्या देशावरील व जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे. पुढील आषाढी एकादशीला सर्व वारकरी, भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडू दे. अशी प्रार्थना केली.
---
वृक्षारोपण करणाऱ्या वारकऱ्याचा देहूत सन्मान
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीपासून वारकऱ्यांना वारीला जात येत नाही. त्यामुळे भाविकांनी नाराज न होता आषाढी वारीची आठवण म्हणून यावर्षी एका झाडाची लागवड करावी. ज्या वारकऱ्याचे झाड पुढील वर्षी चांगले असेल. त्या वारकऱ्याचा देहू संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येईल, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.
---
२०० वारकऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
निळोबाराय दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी आलेल्या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी एकूण २०० वारकऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. सुदाम बागल व डॉ. अपूर्वा वाघमारे यांनी दिली.
---
०४ निळोबाराय महाराज
पिंपळनेर येथे रविवारी संत निळोबाराय महाराज दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आमदार नीलेश लंके व इतर.