डेंग्यूबाबत प्रबोधन
By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-25T00:12:56+5:302014-07-25T00:26:01+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाळ्याचा कालावधी सुरू आहे. या काळात साथजन्य रोगाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे.

डेंग्यूबाबत प्रबोधन
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाळ्याचा कालावधी सुरू आहे. या काळात साथजन्य रोगाचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डेंग्यू संदर्भात दोन लाख ५१ हजार विद्यार्थी आणि एक हजार ८० शिक्षकांचे प्रबोधन केले आहे. स्वच्छता, डास निर्मिती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी आरोग्य विभागाची बैठक झाली. पावसाळ्यात साथजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये. विशेष करून डेंग्यू पासून नागरिक आणि विद्यार्थ्यांचा बचाव करता यावा यासाठी १५ जून ते १५ जुलै दरम्यान ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या ८२२ माध्यमिक शाळांतील २ लाख ५१ हजार ६०१ विद्यार्थ्याचे आरोग्याबाबत प्रबोधन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सेस फं डातून २०१४-१५ चे प्राथमिक आरोग्य केंद्रांना श्वानदंश लस खरेदीसाठी २० लाख, सर्पदंश लससाठी १० लाख आणि साथरोग निवारणार्थ औषध खरेदीसाठी ५ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. २०१३-१४ मध्ये अखर्चित राहिलेल्या निधीतून आदिवासी व बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे, साहित्य व साधन सामुग्री खरेदी २२ लाख ४५ हजार, बिगर आदिवासी क्षेत्रातील आरोग्य केंद्रात साहित्य खरेदीसाठी १० लाख ८६ हजार, मातृत्व अनुदान योजना (आदिवासी क्षेत्र) १२ लाख ४६ हजार रुपये, आदिवासी क्षेत्रातील आरोग्य केंद्रात औषधे खरेदीसाठी २१ लाख २९ हजार रुपये, आदिवासी क्षेत्रातील माता आणि चार वर्षे वय असणाऱ्या बालकांसाठी २९ लाख ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बैठकीला सदस्य मंदा भोसले, स्वाती कानडे, आश्विनी भालदंड, सुनीता बनकर, भास्करराव खर्डे, चित्रा बर्डे, भगवान मुरूमकर, डॉ. पु. ना. गंडाळ, अतिरिक्त आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)