नवीन रेल्वे मार्गाची केंद्राकडे मागणी
By Admin | Updated: June 27, 2014 00:19 IST2014-06-26T23:56:27+5:302014-06-27T00:19:47+5:30
अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात रेल्वे अर्थसंकल्पात नगरची उपेक्षाच झाली़

नवीन रेल्वे मार्गाची केंद्राकडे मागणी
अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात रेल्वे अर्थसंकल्पात नगरची उपेक्षाच झाली़ यावेळी मात्र तसे होणार नाही़ नगरसाठी नवीन काही रेल्वे मार्गांची मागणी केंद्रीय रेल्वे खात्याकडे करण्यात आली असून, अर्थसंकल्पात नगर रेल्वेसाठी भरीव तरतूद होईल,अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा़सदाशिव लोखंडे यांनी दिली़
रेल्वे अर्थसंकल्पाविषयी नगर जिल्ह्याच्या अपेक्षा ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात मुद्देसुदपणे मांडल्या. या अनुषंगाने खा.लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, रेल्वे दळणवळणाचे कमी खर्चाचे साधन आहे़नगरची भराभराट होण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील रेल्वे जाळे वाढविण्याची गरज आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, अत्याधुनिक सुविधा रेल्वे स्थानकावर निर्माण केल्या जातील़ रेल्वे स्थानकावर सी़सी़ टीव्ही कॅमेऱ्यासह इतर सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत़ जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानक अत्याधुनिक केले जाणार आहेत़ नगर-बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे़या रेल्वे मार्गाची माहिती घेऊन अर्थसंकल्पात या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे़पुणे नाशिक -पुणे नवीन रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत़ तसा प्रस्तावही केंद्राकडे देण्यात आला आहे़ पुणे शिर्डी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे़ शिर्डी ते हैद्राबाद रेल्वे सुरू करण्याचा मानस आहे़ भाविकांना शिर्डीला येण्यासाठी अधिकाअधिक रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे़ त्यामुळे प्रवाशांना कमी वेळात आणि कमी खर्चात पुणे, नाशिक, मुंबई आणि हैद्राबादला जाणे शक्य होणार आहे़
नगर- मनमाड सध्या एकच रेल्वे लाईन आहे़ त्यामुळे अनेक अडचणी येतात़ रेल्वे वेळेवर पोहोचत नाहीत़ प्रवाशांना ताटकळत बसावे लागते़ मोठ्या रेल्वेंना इथे थांबविणे शक्य होत नाही़ हा प्रश्न सोडविण्यासाठी नगर- मनमाड दुसरी रेल्वे लाईन टाकणे महत्वाचे आहे़ त्यामुळे ही मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे़रेल्वे स्थानकांची दुरवस्था झाली आहे़रेल्वे स्थानके चकाचक करण्यात येणार आहेत़ सुरक्षा व्यवस्था वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे़ रेल्वे स्थानके अद्ययावत करण्यात येणार आहेत़ आम्ही नवीन आहोत़ सर्वच बाबी एकाचवेळी करणे शक्य होणार नाही़ मात्र टप्प्या टप्याने रेल्वेत सुधारणा केली जाईल़
(प्रतिनिधी)