शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:28+5:302021-02-13T04:21:28+5:30
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन ...

शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या चौकशीची मागणी
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी शुक्रवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, सचिव बाळासाहेब कांबळे, दादासाहेब जावळे, मनोज कर्डिले, भाऊ साळवे, मारुती पाटोळे, चेतन ढगे, अमर निरभवणे, राहुल कांबळे आदी उपस्थित होते.
नगर शहरातील रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडले. रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाला. नगर शहर, नगर तालुकासह संपूर्ण जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेतील बांधकाम विभागाने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामे केली. परंतु, काही दिवसांत रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण नगर शहर सध्या खड्ड्यात आहे. तपोवन रस्त्याच्या कामात ठेकेदाराने डांबर खाल्ले तर अधिकाऱ्याने मलिदा खाल्ला, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नगर शहरासह पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, राहुरी, नगर तालुक्यातील कामांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.