श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातील ५० लाख लोकांसाठी सरकारी व खासगी मिळून अवघ्या ८०० रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना संकटात रेमडेसिविर, ऑक्सिजन आणि बेड्सबरोबरच रुग्णवाहिकांदेखील मिळत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. रुग्णालये आणि अमरधाममध्ये रुग्णांना वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिकांची तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यात सरकारी यंत्रणांकडे कोरोना पीडित रुग्णांच्या सेवेसाठी किती रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता वाईट चित्र दिसून आले. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या जनतेला सरकारी रुग्णवाहिकांचाही दिलासा नाही. त्यामुळे केवळ खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
-----------
१०८ क्रमांकावर ताण
जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या एकूण ४० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यातील १५ वाहने ही कोरोना रुग्णांकरिता देण्यात आलेली आहेत. २५ वाहने मात्र प्रसूती तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या सर्व कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. मात्र सध्या कोरोनाचा भडका उडाल्यामुळे या रुग्णवाहिका अपुऱ्या पडत आहेत.
-----------
जिल्हा रुग्णालयाकडेही तूट
जिल्हा रुग्णालयाकडे स्वत:च्या ५ रुग्णवाहिका आहेत. याशिवाय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते, आमदार नीलेश लंके, आमदार किरण लहामटे, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार यांनी प्रत्येकी एक रुग्णवाहिका सुपुर्द केली आहे. मात्र यातील केवळ तीन वाहने ताब्यात मिळाली आहेत. उर्वरित पाच पुढील आठवड्यात प्राप्त होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
-----------
आरोग्य यंत्रणेकडे ८६ रुग्णवाहिका
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालये येथे ८६ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नाही. जननी शिशु सुरक्षा अभियानातील १०२ क्रमांकाच्या या रुग्णवाहिका आहेत. यातील दोन वाहने जिल्हा रुग्णालय, २१ ग्रामीण रुग्णालय तर ६३ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे कार्यरत आहेत. ही वाहने बिगर कोरोना रुग्णांसाठी आहेत.
-----------
जिल्ह्याची रुग्णवाहिकेची आकडेवारी
सरकारी रुग्णवाहिका : १२६
खासगी रुग्णवाहिका : ६७८
ऑक्सिजन असलेल्या : ४० (सरकारी)
खासगी : आकडेवारी नाही.
------------
तक्रार कुठे करायची?
खासगी रुग्णवाहिकांवर भाडे आकारणीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबत कुठे तक्रार करण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांकडून कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यापूर्वी पीपीई किटची मागणी केली जात आहे.
----------
सध्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी दररोज २०० ते ३०० फोन कॉल्स येतात. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वांनाच वेळेवर सेवा देताना अडचणी येत आहेत. प्रसूती तसेच अपघातग्रस्तांना सेवा देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सुवर्णमाला गोखले,
समन्वयक, बीव्हीजी, नगर
----------