वर्गणीस नकार दिल्याने दाम्पत्याला मारहाण
By Admin | Updated: October 3, 2016 00:22 IST2016-10-03T00:17:15+5:302016-10-03T00:22:03+5:30
अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले

वर्गणीस नकार दिल्याने दाम्पत्याला मारहाण
अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ शहरातील सिद्धार्थनगर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मारहाणीनंतर पाटोळे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले असता आरोपींनी तेथे जाऊनही त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली़
घटनेनंतर पाटोळे यांचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली नाही़ उलट ज्यांनी मारहाण केली़ त्यांची फिर्याद मात्र, तातडीने दाखल करून घेतल्याने तोफखाना पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे़ सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रुग्णालयात जाऊन जखमी पाटोळे यांचा जबाब घेतला त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली़ राजू पाटोळे यांचे सिद्धार्थ नगर येथील करंदीकर रुग्णालयाजवळ इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे दुकान आहे़ या ठिकाणी शुक्रवारी साडेसात वाजेच्या सुमारास विजय पठारे, संजय पठारे, गणेश घोरपडे व सागर साठे यांच्यासह चार ते पाच जणांनी येऊन पाटोळे यांना गणपती मंडळाची पाच हजार रुपयांची वर्गणी तसेच महिन्याला ६०० रुपये हप्ता मागितला़ हे पैसे देण्यास पाटोळे यांनी नकार दिल्याने आरोपींनी पाटोळे यांच्या दुकानाची तोडफोड करत त्यांना लाकडी दांडा व लोखंडी गजाने मारहाण केली़
यावेळी मध्ये सोडविण्यास गेलेल्या पाटोळे यांची पत्नी मनिषा, मुलगा ऋषीकेश व कुणाल यांनाही मारहाण करण्यात आली़ घटनेनंतर पाटोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथेही आरोपींनी येऊन पाटोळे कुटुंबीयांना मारहाण करून दहशत निर्माण केली़ या मारहाणीत पाटोळे हे गंभीर तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत़ दरम्यान राजू पाटोळे यांच्या फिर्यादिवरून विजय पठारे, संजय पठारे, गणेश घोरपडे व सागर साठे (सर्व रा़ सिद्धार्थनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी मात्र, यातील एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ दरम्यान या घटनेनंतर विजय राजू पठारे यानेही तोफखाना पोलीस ठाण्यात राजू पाटोळे, संदीप पाटोळे, वैभव पाटोळे, विशाल पाटोळे यांच्या विरोधात फिर्याद देत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे़ सिद्धार्थनगर येथे मारहाणीच्या घटनेनंतर चार ते पाच जणांनी जिल्हा रुग्णालयात येऊनही दहशत निर्माण करत खुर्च्यांची फेकाफेक करून मारहाण केली़ ही घटना रुग्णालयातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे़ (प्रतिनिधी)
पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास विलंब का केला़? गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा दुसऱ्या दिवशी बारा वाजता का जबाब घेतला? तसेच प्रकरण गंभीर असूनही यातील कोणत्याच आरोपींना अटक का करण्यात आली नाही असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत़