कर्जत : विरोधकांनी पैशाची मागणी केली ती पूर्ण केली नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना खोटी माहिती देऊन माझी व बँकेची बदनामी केलेल्या पारनेर तालुक्यातील चौघांवर प्रत्येकी एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानभरपाईचा दावा ठोकणार आहे. बाळासाहेब नरसाळे हे स्वीकृत संचालक नाहीत, अशी माहिती पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांनी दिली.
निराधारांचे पैसे हडप केल्याप्रकरणी कर्जतच्या शाखाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी बाळासाहेब नरसाळे, विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ यांनी केली होती. याप्रकरणी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने लेखापरीक्षण केले व यामध्ये २३ लाख रुपयांचा अपहार झाला, असे त्यांनी म्हटले होते. हे सर्व आरोप खोटे आहेत. आरोप करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याकडील खरा लेखापरीक्षण अहवाल घेऊन यावा. आम्ही खरा अहवाल घेऊन येतो, असे आव्हान फरांडे यांनी दिले.
कर्जत तहसील कार्यालयाने २०१२ ते २०२० या कालावधीतील अनुदानाच्या वाटपात आमच्या बँकेचे कर्मचारी दीपक अनारसे यांनी फेरफार केला हा प्रकार लक्षात येताच, ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. तहसील कार्यालयाने निराधार खातेदारांना वाटप करण्यासाठी दिलेली रक्कम व प्रत्यक्ष वाटप झालेली रक्कम यातील फरक १ लाख ४६ हजार रुपये आम्ही बँकेत भरणा केला आहे. या प्रकरणाचे ऑडिट झाले आहे. तालुक्यातील विविध बँकांच्या चौदा शाखांमधून घेतलेल्या माहितीनुसार गोषवारा चुकल्यामुळे २३ लाख ६८ हजार ६०० रुपये तफावत दिसत आहे. हा अपहार नाही, असे फरांडे यांनी म्हटले आहे.