तंटामुक्तीच्या सहभागाला उतरती कळा
By Admin | Updated: May 20, 2016 00:27 IST2016-05-20T00:22:38+5:302016-05-20T00:27:55+5:30
अहमदनगर : आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानातील सहभागाला आता उतरती कळा लागली आहे.

तंटामुक्तीच्या सहभागाला उतरती कळा
अहमदनगर : आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानातील सहभागाला आता उतरती कळा लागली आहे. यंदाच्या अभियानात फक्त २५ गावेच पात्र ठरली असून त्यांची तालुका समितीमार्फत पाहणी करण्यात येत आहे. दाखल झालेल्या तंट्यांपैकी मिटविलेल्या तंट्यांचे प्रमाणही अवघे सहा टक्क्यांवर आले आहे.
गावातले तंटे गावातच मिटवावेत आणि गावात शांतता, कायदा व सुव्यवस्था नांदावी यासाठी २००७ पासून तंटामुक्त अभियान सुरू झाले. सुरवातीच्या तीन-चार वर्षात गावांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
एकदा पुरस्कार मिळालेल्या गावाला पुन्हा या योजनेत सहभागी होता येत नाही. तरीही जी गावे आतापर्यंत तंटामुक्त झाली नाहीत, त्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखविल्याचे दिसत नाही. गेल्या चार वर्षांची आकडेवारी पाहता या योजनेत सहभाग नोंदविणाऱ्या गावांची संख्या कमी होताना दिसते आहे.
दरम्यान पात्र १५ गावांमध्ये जिल्ह्यांतर्गत तालुक्यांच्या समित्या ५ मे ते ५ जून या कालावधीत पाहणी करीत आहेत. त्यानंतर २० जून ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्याबाहेरील समित्या पात्र गावांची पाहणी करणार आहेत.
(प्रतिनिधी)