महासभा बोलविण्याचा निर्णय
By Admin | Updated: June 22, 2014 00:21 IST2014-06-21T23:43:09+5:302014-06-22T00:21:53+5:30
अहमदनगर : शहर बससेवा सुरू व्हावी यासाठी आता महापौर संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष महासभा बोलविण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महासभा बोलविण्याचा निर्णय
अहमदनगर : शहर बससेवा सुरू व्हावी यासाठी आता महापौर संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष महासभा बोलविण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत शहर बससेवा बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्थायी समितीच्या निर्णयानंतर अभिकर्ता संस्थेने बससेवा बंद केली आहे. शहरातील नागरिक व सगळ्याच नगरसेवकांकडून त्यासंदर्भात नाराजी व्यक्त होत आहे. अर्थातच ही नाराजी स्थायी समितीच्या विरोधात आहे. युतीच्या नगरसेवकांनी विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने महापौर जगताप यांनी शनिवारी सायंकाळी महापालिकेत स्थायी समितीचे सभापती व नगरसेवकांशी चर्चा केली. दोन तास ही चर्चा सुरू होती. अभिकर्ता संस्थेच्या संचालकांशी चर्चा करू. त्यानंतर महासभा बोलविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत शहर बससेवा बंद राहणार नाही. माझ्याच कार्यकाळात सेवा सुरू झाली ती माझ्या कार्यकाळात बंद होणार नाही. अभिकर्ता संस्थेने नुकसान भरपाई मागणे म्हणजे करारभंग नाही. महासभेत २.९६ लाख दरमहा तोट्यापोटी देण्याचा निर्णय झालेला आहे. महासभा ही सर्वोच्च असते. महासभेत निर्णय झाल्यानंतर तो अंतिम असतो. त्यामुळे अभिकर्ता संस्थेशी चर्चा केली जाईल. त्यानंतर त्यासंदर्भात विशेष महासभेचे आयोजन केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.बससेवेसंदर्भात प्रशासनाकडून प्रस्ताव मागविला जाणार आहे. त्यानंतर महासभा होईल असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सत्ताधाऱ्यांची मागणी
शहर बससेवा सुरू व्हावी यासाठी विशेष महासभा बोलविण्याची मागणी उपमहापौर सुवर्णा कोतकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, उपसभापती कलावती शेळके, मनसेचे गणेश भोसले, आरीफ शेख, स्वप्नील शिंदे, कैलास गिरवले, सुनील कोतकर, संजय लोंढे, रुपाली निखील वारे, संजय घुले, विपुल शेटिया, शीतल संग्राम जगताप, आशाबाई पवार या सत्तेतील नगरसेवकांनीही विशेष महसभा बोलविण्याची मागणी केली.