जागावाटपाचा निर्णय काँग्रेसमुळे लांबला
By Admin | Updated: May 1, 2024 11:36 IST2014-09-16T23:55:36+5:302024-05-01T11:36:25+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय झाला असला तरी जागावाटपाचा निर्णय काँग्रेसमुळेच लांबला आहे.

जागावाटपाचा निर्णय काँग्रेसमुळे लांबला
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय झाला असला तरी जागावाटपाचा निर्णय काँग्रेसमुळेच लांबला आहे. नगर जिल्ह्यातील ज्या जागा राष्ट्रवादीच्या आहेत, त्यांच्यासह नगर शहर मतदारसंघ आणि कर्जत- जामखेडच्या जागेचा आग्रह कायम असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली.
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित होते. यावेळी बोलतांना काकडे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा आणि मनसे हे पाचही पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास राज्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिल. गेल्या महिन्यांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस सोबत आघाडीबाबतची चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसकडून जागावाटपाचा निर्णय अंतिम केलेला नाही. यामुळे ही प्रक्रिया लांबली असल्याचा आरोप काकडे यांनी
केला.
जिल्ह्यातील पारनेर, राहुरीच्या जागा राष्ट्रवादीच्या आहेत. त्या ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. पारनेर तालुक्यात आठ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. यापैकी एकाचे नाव अंतिम होणार आहे. नगर शहर आणि कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. यामुळे या जागांचा आग्रह काँग्रेसकडे धरण्यात आलेला आहे.
जागावाटपात अखेरच्या क्षणापर्यंत या दोन्ही मतदारसंघासाठी राष्ट्रवादी आग्रही राहणार आहे. नगर शहरात सात इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मनपात राष्ट्रवादीची सत्ता असून यामुळे विधानसभेला यश मिळू शकते असा विश्वास काकडे यांनी केला. जिल्हा परिषदेतील पदाधिकारीत निवडी या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.