कर्जतकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:01+5:302020-12-28T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर काय होऊ शकत नाही, याचा अनुभव सध्या कर्जतकर ...

कर्जतकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर काय होऊ शकत नाही, याचा अनुभव सध्या कर्जतकर घेत आहेत. पाेलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील मुख्य रस्त्यालगत लक्ष्मणरेषा (दोरी) ओढल्याने शहरातील वाहन चालक, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही शिस्त लागली आहे. त्यामुळे पूर्वी वाहतुकीसाठी कमी पडणारा रस्ता आता मोठा दिसू लागला असून, वाहतूक कोंडीतूनही शहरवासीयांची मुक्तता झाली आहे.
शहरातील मिरजगाव व राशीन या मुख्य रस्त्यांची बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडी झाली होती. वर्षानुवर्षे हे असेच चालू होते. यामुळे अनेक वेळा लहान-मोठे वाद होत असत. याच महिन्यात चंद्रशेखर यादव हे पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाले. त्यांनी शहरातील चित्र बदलविण्यासाठी विविध सामाजिक संघटना, व्यापारी, नागरिक यांच्या बैठका घेऊन चर्चा केली. त्यामुळे कर्जतकरांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास वाढला.
पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्यालगत लक्ष्मणरेषा आखून दिली व नागरिकही शिस्तीचे पालन करू लागले. यामुळे एरवी अरुंद असलेला रस्ता आता मोठा झाला. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असूनही योग्य नियोजन करीत होमगार्डस्ना मदतीला घेऊन यादव यांनी हे काम सुरू केले आहे. यादव यांच्यामुळे शहरवासीयांना पोलीस निरीक्षक हनमंत जगदाळे यांच्या कार्यकाळाची आठवण झाली.
रस्त्याच्या बाजूला टाकलेली फक्की विसकटत असल्याचे पाहून आता पोलीस प्रशासनाने रस्त्याच्या कडेला ‘नो पार्किंग’साठी सुती दोराचा वापर सुरू केला आहे. यामुळे आता वाहनचालकांना या दोरीच्या बाहेरच राहावे लागणार आहे. याची धास्ती वाहनचालकांनी घेतली आहे. त्यामुळे रस्त्यावर आडवी-तिडवी वाहने उभी करण्यात धन्यता मानणारे आता शिस्तबद्ध वाहने उभी करीत आहेत.
चौकट...
पोलीस ठाण्यापासूनच सुरुवात..
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शिस्तीची सुरुवात स्वतःपासून केली. पोलीस ठाणे परिसरातील बेशिस्तपणा त्यांनी प्रथम बंद केला. त्यातून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. कर्जतपाठोपाठ त्यांनी हा प्रयोग राशीन येथे सुरू केला आहे. दोन्ही ठिकाणी बेशिस्त वाहनचालक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
(फोटो २७ कर्जत रोड)
कर्जत येथील मुख्य रस्त्यालगत पार्किंगसाठी फक्कीऐवजी दोरी लावली आहे.