बाळंतपणात महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 7, 2014 23:37 IST2014-07-07T23:37:32+5:302014-07-07T23:37:32+5:30
अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला.

बाळंतपणात महिलेचा मृत्यू
अहमदनगर : एका खासगी रुग्णालयात बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणलेल्या महिलेचा मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अॅब्युलन्समध्येच ठेवण्यात आला. त्यामुळे तब्बल बारा तास ताटकळलेल्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. अखेर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तो मृतदेह पुणे येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र या प्रकाराने पोलीस आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.
अश्विनी दत्तात्रय इजारे (मूळ रा. सोलापूर, पाथर्डीला माहेर)ही महिला बाळंतपणासाठी दोन-तीन दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. रविवारी रात्री ती बाळंत झाली आणि तिला मुलगा झाला. मात्र बाळंतपणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. रक्तस्त्राव झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. परंतु डॉक्टरांच्या संपामुळे मृतदेह बराचवेळ ताटकळत पडला. बाळंतपणात मृत्यू झालेल्या महिलेचे शवविच्छेदन पुणे किंवा औरंगाबाद येथे करण्यात येते.
जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासन यांची कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर पाठविला जातो. नेमक्या या प्रक्रियेची माहिती मयताच्या नातेवाईकांना दिली गेली नसल्याने ते संतप्त झाले. रात्रभर मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी अॅम्ब्युलन्समध्येच ठेवल्याने नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाशीही संपर्क साधला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोलीस अधिकाऱ्याच्या सहीसाठी मृतदेह ताटकळत पडला, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
सोमवारी सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि पोलीस व डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह पुणे येथे पाठविण्यात आला. महिलेला झालेले बाळ सुरक्षित असून त्याला महिलेच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. (प्रतिनिधी)