अहमदनगरमध्ये मार्बलखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:29 IST2018-09-27T17:17:35+5:302018-09-27T17:29:58+5:30
ट्रकमधून मार्बल फरशी उतरवत असताना मार्बलखाली दबून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला.

अहमदनगरमध्ये मार्बलखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू
अहमदनगर : ट्रकमधून मार्बल फरशी उतरवत असताना मार्बलखाली दबून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना गुलमोहोर रोड परिसरात घडली.
विनोद छोटेलाल सरोज (वय ३०, रा. ढखवा, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश, हल्ली रेवती इंजिनिअरिंग, एमआयडीसी) व राज भगवानदास साकेत (वय २०, रा. बमुव्हिया, जि. रिवा, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
सावेडीतील जॉकिंग ट्रॅक परिसरात एका बंगल्याच्या कामासाठी गुरूवारी सकाळी मार्बल फरशी घेऊन ट्रक आला होता. ट्रकमध्ये दोन्ही बाजूने मार्बलची थप्पी लावण्यात आली होती. हे मार्बल गाडीतून उतरवण्याचे काम सात ते आठ मजूर करत असताना अचानक एका बाजूची थप्पी ढासळली. त्याखाली सरोज व साकेत हे दोघे मजूर दबले गेले. इतर मजुरांनी काही वेळात मार्बल बाजूला केले, मात्र गंभीर जखमी झाल्याने या दोघांचा मृत्यू झाला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.