मारहाणीत चोरट्यांचा मृत्यू

By Admin | Updated: October 23, 2014 14:51 IST2014-10-23T14:51:33+5:302014-10-23T14:51:33+5:30

चोर समजून ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोघा जणांचा नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

The death of the robbery | मारहाणीत चोरट्यांचा मृत्यू

मारहाणीत चोरट्यांचा मृत्यू

>पारनेर : चोर समजून ग्रामस्थांनी केलेल्या बेदम मारहाणीत दोघा जणांचा नगरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास तालुक्यातील अळकुटी येथे ही घटना घडली होती. 
दोघा जणांच्या मृत्युमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याचा धोका आहे. याप्रकरणी आता पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अळकुटी येथे सोमवारी रात्रीपासून चोरट्यांनी घोलप मळा, पुंडे मळासह गावामध्ये चोरीचा प्रयत्न केला. साधारण चार ते पाच जणांच्या टोळीकडून हा प्रयत्न सुरु असताना अळकुटी गावातील ग्रामस्थ जागे झाले. व त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
लोणीमावळा रस्त्यानजीक पहाटे पाचच्या दरम्यान या चोरट्यांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समजली.
दरम्यान, या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिलेला असला तरी अधिक माहिती देण्यास त्यांनी मात्र नकार दिला. हे चौघे चोरी करताना पकडले की संशय घेऊन पकडले याची माहिती अजून समोर आली नसल्याने अळकुटी परिसरात घबराटीचे वातावरण आहे.  पारनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 
(तालुका प्रतिनिधी) 
-----------------------
बेदम मारहाणीत दोघा जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे अळकुटीतील अनेक जणांच्या अंगलट हा प्रकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मारहाणीविषयी अळकुटीत कानोसा घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी मौन बाळगले आहे.
-----------------------
श्रीगोंदा : श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील जीवघेण्या दरोड्यांची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. दरोड्यांच्या या मालिकांना ब्रेक लावण्यासाठी शस्त्रधारी पोलिसांचे दरोडा नियंत्रण पथक नेमण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. 
गेल्या दहा वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यात पडलेल्या दरोड्यात १५ जणांचा बळी गेला आहे. परंतु एकाही दरोड्याचा यशस्वीरित्या तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. 
मागील आठवड्यात निमगाव खलू येथील दरोड्यात वच्छलाबाई जठार या महिलेचा बळी गेला. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.
जिल्हा पोलीस प्रमुख लखमी गौतम यांनी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन श्रीगोंदा, कर्जत, जामखेडसाठी दरोडे नियंत्रण पथकाची नियुक्ती केली. हे पथक रात्री गस्त, नाकेबंदी करणार आहे. तसेच मागील दरोड्यांच्या तपासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. 
दरोड्यासाठी संवेदनशील असलेल्या काष्टी, आढळगाव, बारडगाव, बेलवंडी परिसरात दरोडे नियंत्रण पथकाची करडी नजर राहणार आहे. या पथकामुळे दरोड्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्‍वास कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी व्यक्त केला. 
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death of the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.