बिबट्याच्या हल्यात वृद्धाचा मृत्यू
By Admin | Updated: March 25, 2017 20:26 IST2017-03-25T20:26:23+5:302017-03-25T20:26:23+5:30
मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला.

बिबट्याच्या हल्यात वृद्धाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
संगमनेर (अहमदनगर), दि. 25 - मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. या हल्ल्यात गबाजी रुपवते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खांडगाव येथील रहिवासी गबाजी बुधवारी सायंकाळी मुलीला भेटायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खांडगाव शिवारातील एका शेतामध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
एका ग्रामस्थाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती गावात दिली. यानंतर गबाजी यांच्या मुलगा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात दिली. आपल्या वडिलांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याचे त्यांनी म्हटले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, वनपाल निलेश आखाडे, शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व वन कर्मचा-यांनी भेट देवून पंचनामा केला.
अवयव कुजल्याने मृतदेह हलवणे शक्य नव्हते. म्हणून जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रूपवते यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाला नसल्याचा दावा वन विभागाच्या अधिका-यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा होवू शकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.